भाजपकडून मतदार यादी निरीक्षक पदी पेरशा ठाकूर
पनवेल (बातमीदार) ः भाजपच्या वतीने पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी मतदार यादी निरीक्षक पदावर पेरशा ठाकूर यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र गुरुवारी (ता. २६) प्रसिद्ध केले असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर झाली आहे. या नियुक्तीनंतर पेरशा ठाकूर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत जबाबदारीचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदार नोंदणी व पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर भर देत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले. पनवेल विधानसभा क्षेत्रात या नियुक्तीमुळे भाजपच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळणार असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत संघटन अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले.