घाटकोपरमध्ये गांजासह एकाला अटक
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः घाटकोपर परिसरात अमली पदार्थविरोधी मोहिमेला गती देत पंतनगर पोलिसांनी १९७ ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ७:३५ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील रायझिंग सिटी, पी.डब्ल्यू. मैदान परिसरात करण्यात आली. धारावीत राहणाऱ्या राम कृष्णा मुपणार (वय ५८) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून विक्रीसाठी ठेवलेला गांजा अंदाजे किंमत ६,००० रुपये तसेच २५० रुपये रोख रक्कम असा एकूण ६,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जयवंत पवार आणि त्यांच्या पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला. ही संपूर्ण कारवाई पोलिस उपआयुक्त (झोन ७), सहाय्यक पोलिस आयुक्त घाटकोपर विभाग तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार व निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.