वहाळ येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
उलवे, ता. १ (बातमीदार) : वहाळ गावात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याला पंचक्रोशीतून भाविक उपस्थित होते. या कीर्तनातून सध्या अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजातील भोंदू बाबांच्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे अनेक गावे विस्थापित झाली असली तरी पुनर्वसनाच्या ठिकाणी ग्रामस्थांनी आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यावर भर दिला आहे. मंदिर हे केवळ उपासनेचे ठिकाण न राहता ग्रामस्थांना एकत्र आणणारे केंद्र ठरत असून अशा उपक्रमांमधून नव्या पिढीपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक मूल्ये पोहोचवली जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.