तर ठाण्यातून आयटी सेक्टर हद्दपार होतील
- नगरसेवक योगेश जाणकरांनी व्यक्त केली भीती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात झपाट्याने वाढणाऱ्या रोजगार संधींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीकडे दुर्लक्ष केल्यास आयटी कंपन्या ठाण्याबाहेर कूच करतील, अशी भीती शिवसेने (शिंदे गट)चे नगरसेवक योगेश जाणकर यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय चर्चेच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत अनेक मुद्द्यांवर बोट ठेवले.
मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनी आयटी क्षेत्रावरील कर मर्यादित ठेवून उद्योगांना दिलासा दिला आहे. मात्र, ठाणे महापालिका जर करवाढीचा हट्ट धरत राहिली, तर आयटी कंपन्या इथून पाय काढतील, असा स्पष्ट इशारा जाणकर यांनी दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर करांचा बोजा टाकला, तर रोजगाराच्या संधींचा गळा घोटला जाईल, अशी टीकाही त्यांनी केली. याचबरोबर नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीतील १५ टक्के रक्कम गरजू रुग्णांसाठी वापरण्याची मुभा देऊन प्रत्येक रुग्णाला २५ हजारांपर्यंत मदत देण्याची योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मांडली. तसेच महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाइकांशी समन्वय साधण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज त्यांनी ठळकपणे मांडली.
दरम्यान, कळवा-मुंब्रा-दिवा भागाच्या विकासावरून सभागृहात जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगले. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नगरसेवकांनी या भागांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यावर प्रत्युत्तर देताना जाणकर यांनी मुंब्रा येथील स्टेडियम, ५०० खाटांचे रुग्णालय आणि २०१२ पासून उभारण्यात आलेल्या विविध सुविधांचा दाखला देत विरोधकांवरच निशाणा साधला. सुविधा दिल्या, पण त्यांचा योग्य वापर करण्यात स्थानिक प्रतिनिधी अपयशी ठरले, असा पलटवार त्यांनी केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजप नगरसेवकांनी केलेल्या टीकेलाही जाणकरांनी ठामपणे उत्तर देत प्रशासन आणि विरोधक दोघांनाही लक्ष्य केल्याने चर्चा अधिकच तापली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.