महापालिका शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर
११ ते २२ एप्रिल यादरम्यान परीक्षा आयोजित करण्याच्या सूचना
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) ः दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या महापालिकेच्या शाळांमधील वार्षिक परीक्षा आता लांबणीवर गेल्या आहेत. संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षांसाठी, शाळांच्या वार्षिक परीक्षा ११ ते २२ एप्रिल यादरम्यान घेण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका शाळांमधील वार्षिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा कालावधीही वाढला आहे.
शासनाच्या समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षा यावर्षीपासून घेतली जात आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता २ री ते ८ वी करिता दोन सत्रात ही संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा घेतली जात आहे. पहिली चाचणी सहामाही परीक्षेदरम्यान झाली आहे, तर दुसरी परीक्षा ही आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नियोजित करण्यात आली आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षेबरोबर विद्यार्थ्यांवर या मूल्यमापन चाचणी परीक्षेचा भार असणार आहे. राज्यातील शिक्षणपद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे नियोजन आले आहे. त्यापैकी नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पहिली पायाभूत व संकलित चाचणी-जुलै व ऑक्टोबर २०२५ मध्ये घेण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित संकलित चाचणी परीक्षा आता ११, १५ आणि २२ एप्रिल यादरम्यान घेण्याचे नियोजन शिक्षण संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. याचदरम्यान, शाळांमधील वार्षिक परीक्षा घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. या सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व अनुदानित शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक राज्य शिक्षण मंडळाच्या खासगी, अनुदानित शाळांच्या परीक्षा आता सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्या संपतील आणि मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. महापालिका शाळांचेही वेळापत्रक असेच होते. मात्र, या सूचनांमुळे त्यांना आपले वार्षिक नियोजन बदलावे लागले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा आता या सूचनेनुसार दुसऱ्या आठवड्यात ठरलेल्या वेळेत ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एप्रिल २२ पर्यंत शाळेत यावे लागणार आहे. या संकलित मूल्यमापन चाचणी-२ चे वेळापत्रकही देण्यात आले आहे. याअंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
अध्ययन, अध्यापन सुलभ होण्यास मदत
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादन केले आहे किंवा नाही याची माहिती होऊन अध्ययन, अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. त्याचबरोबर या चाचण्या १०वी व १२वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये, असेही आलेल्या आदेशात म्हटले आहे. चाचण्यांचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांचे इयत्तेनुसार अध्ययन किती झाले आहे, हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
संकलित चाचणीचे उद्देश, उपयोग, फायदे
१) विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल.
४) अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.