तुर्भे, ता. १ (बातमीदार) : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, त्याचा थेट परिणाम भावांवर दिसून येत आहे. आवक वाढल्याने हापूसच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांनी घसरण झाली असून, आता हे आंबे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येऊ लागले आहेत.
मागील आठवड्यापर्यंत हापूस आंब्याचे भाव तीन ते पाच डझनसाठी अडीच हजार ते सात हजारांदरम्यान होते; मात्र सध्या हेच भाव घसरून दोन हजार ते सहा हजारांपर्यंत आले आहेत. त्यामुळे किरकोळ ग्राहकांसह व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, भाव आणखी कमी होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले राहील, अशी अपेक्षा सुरुवातीला व्यक्त करण्यात आली होती. मात्र, हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी हवामानाचा फटका बसल्याने बाजारात आंब्यांची आवक उशिराने सुरू झाली. परिणामी, सुरुवातीच्या काळात हापूसचे भाव गगनाला भिडले होते. गुढीपाडव्यापर्यंत एका पेटीचे भाव तीन हजार ते नऊ हजारांपर्यंत पोहोचले होते. मात्र, पाडवा संपताच परिस्थितीत बदल होऊ लागला.
मागील आठवड्यापासून बाजारात हळूहळू आवक वाढू लागली आणि भावात सुमारे १० टक्क्यांची घट झाली. त्यानंतर सोमवार (ता. ३०)पासून आवक आणखी वेगाने वाढू लागली आहे. सोमवारीच बाजारात कोकणातून तब्बल ३४,६९० पेट्या हापूस आंब्यांची नोंद झाली आहे.
तापमान वाढल्याचा परिणाम
सध्या कोकणात तापमान वाढत असल्याने आंबा जलद गतीने पिकत आहे. त्यामुळे येत्या काळात बाजारात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भाव आणखी कमी होऊन हापूस आंबा सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या भावात उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वाढती आवक आणि घसरते भाव यामुळे बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढू लागली असून, हंगाम आता रंगात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
भाव अजून घसरण्याचा अंदाज
सोमवारपासून बाजारात हापूस आंब्यांची आवक वाढत आहे. त्यामुळे भावात सुमारे २० टक्क्यांची घसरण झाली असून, पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढल्यास भाव आणखी खाली येतील, असे एपीएमसीतील फळ व्यापारी अक्षय ढेबी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.