उल्हासनगरात स्कायवॉकखाली गांजाविक्री
मध्यवर्ती पोलिसांची मध्यरात्री धाड; ७०० ग्रॅम गांजासह एकाला बेड्या
उल्हासनगर, ता. १ (बातमीदार) : रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकखाली चालणाऱ्या गांजाविक्रीच्या काळ्या धंद्याचा मध्यवर्ती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. संजय गांधी नगर परिसरात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ७०० ग्रॅम गांजा जप्त केला असून, एका ड्रग डीलरला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये गांजा तस्करी उघडकीस आली होती, ज्यातील आरोपी विठ्ठलवाडी हद्दीतील रहिवासी होते. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे आणि तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या धाडसी कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कोबरने, विलास मालशेट्टे यांच्यासह पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, किशोर काळे, प्रशांत धुळे आणि विश्वास माने यांचा समावेश होता.
पोलिस शिपाई किशोर काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला. सोमवारी रात्री दीड वाजता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकली. पोलिसांनी घटनास्थळावरून अशोक रोकडे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ७०० ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. आरोपीने हा माल नेमका कुठून आणला आणि त्याचे आणखी कोणाशी संबंध आहेत, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपी अशोक रोकडे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.