रिक्षा चालक-मालक संघटनेचा मेळावा
कासा (बातमीदार) ः पालघर जिल्हा चालक-मालक संघटना (सीआयटीयू) यांच्या वतीने रिक्षा चालक-मालकांचा जाहीर मेळावा आमदार विनोद निकोले यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्यात रिक्षा व्यवसायासंदर्भातील विविध समस्या, अडचणी, उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सर्व रिक्षाचालकांनी निश्चित मार्गानुसारच वाहतूक करावी, प्रत्येक रिक्षा स्टॅंडवर संबंधित मार्गाची माहिती दर्शविणाऱ्या पाट्या लावाव्यात, तसेच प्रत्येक रिक्षाच्या पाठीमागे रूटचा बॅनर लावावा, असे निर्देश देण्यात आले. रिक्षांचे पासिंग सुलभ व्हावे, यासाठी डहाणू येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) विशेष कॅम्प घेण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच दरवर्षी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेदरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, रिक्षाचालक- मालकांना आरटीओ प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.