नायर रुग्णालयातील ‘आदी’ शाळा स्वमग्न मुलांसाठी ठरतेय आधार
शिक्षण, उपचार आणि पुनर्वसन एकाच ठिकाणी; मुंबईतील एकमेव विनामूल्य सुविधा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ :
जागतिक स्वमग्नता दिवस उद्या (ता. २) साजरा होत असून, मुंबई महापालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयातील ‘आदी’ (ऑटिझम डायनॅमिक इंटरव्हेन्शन) ही विशेष शाळा स्वमग्न (ऑटिझमग्रस्त) मुलांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे. महापालिकेकडून चालवली जाणारी ही मुंबईतील एकमेव विनामूल्य शाळा असून, येथे शिक्षण, उपचार आणि पुनर्वसन सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
अशा प्रकारच्या शाळा पालिका रुग्णालये किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची गरज जागतिक स्वमग्नता दिनानिमित्त तज्ज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २००८मध्ये सुरू झालेली ही शाळा आज ४४ विद्यार्थ्यांसह कार्यरत असून, २००८ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण १४६ विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले आहे.
‘आदी’ शाळेत विशेष शिक्षणाबरोबरच ऑक्युपेशनल थेरपी, वाणी व श्रवणोपचार, किचन आणि संगणक संबंधित उपक्रम, आय-पॅड आधारित शिक्षण अशा विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास केला जातो. जून २०१८ पासून ‘अॅनिमल असिस्टेड थेरपी’ सुरू करण्यात आली आहे. २०११ पासून आतापर्यंत सुमारे २,७०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन येथे करण्यात आले आहे. देशभरातून येणाऱ्या विशेष मुलांचे दर शनिवारी मूल्यांकन करून त्यांना आवश्यक शैक्षणिक सवलती दिल्या जातात.
काही विद्यार्थ्यांनी नियमित शाळांमध्ये प्रवेश घेतला असून, एनआयओएस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगअंतर्गत ‘ए’ व ‘बी’ स्तराच्या परीक्षांमध्येही यश संपादन केले आहे, असे नायरच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. निना सावंत यांनी सांगितले. त्यांच्यासह प्राध्यापक (अतिरिक्त) डॉ. अलका सुब्रमण्यम आणि मुख्याध्यापक हेमा मोरे या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.
विशेष शिक्षकांसोबत मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वाणी उपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आदी तज्ज्ञ एकत्रितपणे मुलांच्या गरजेनुसार उपचार देतात. त्यामुळे पालकांना वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करावी लागत नाही.
स्वावलंबी आणि सक्षम नागरिक घडवणे
या शाळेचा मुख्य उद्देश मुलांना दैनंदिन जीवनात स्वावलंबी बनवणे, सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे, नियमित शिक्षणासाठी तयार करणे आणि भविष्यात समाजाचा उत्पादक सदस्य बनवणे हा आहे. तसेच व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावरही भर दिला जातो.
सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण
नायर रुग्णालयाच्या सुरक्षित परिसरात कार्यरत असल्यामुळे गेल्या १७ वर्षांत कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. एकाच ठिकाणी शिक्षण, उपचार आणि मूल्यांकन सुविधा उपलब्ध असल्यामुळे पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
सीएसआर निधीची गरज अधोरेखित
‘आदी’ शाळा विनामूल्य सेवा देत असली तरी वाढत्या गरजांमुळे अधिक संसाधनांची आवश्यकता भासत आहे. अधिक विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी सीएसआर निधी अत्यावश्यक आहे. योग्य आर्थिक पाठबळ मिळाल्यास या उपक्रमाचा विस्तार करता येईल.
स्वमग्नता म्हणजे काय?
स्वमग्नता हा मेंदूच्या विकासाशी संबंधित विकार असून, त्याचा परिणाम मुलांच्या वर्तन, संवाद आणि सामाजिक कौशल्यांवर होतो. लक्षणे लहान वयातच दिसून येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.