‘माझे अक्षर, माझी ओळख’ प्रकाशन सोहळा उत्साहात
नवी मुंबई, ता. १ ः अक्षरसाधना पब्लिकेशन प्रकाशित श्रीराम साहेबराव महाजन लिखित ‘माझे अक्षर, माझी ओळख’ पुस्तक प्रकाशन सोहळा चेंबूर येथील कर्नाटका हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला. गणेश वंदना, गुरुवंदना, लावणी नृत्यांनी कार्यक्रमाची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाजन यांचा जीवन प्रवासावर डॉक्युमेंटरी फिल्म दाखवली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चेंबूर कर्नाटका संघाचे अध्यक्ष चंद्रकांत नाईक, चित्रकार डॉ. गणेश तरतरे, लेखक डॉ. गजानन शेपाळ, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुलेखनकार राम कस्तुरे, माजी शिक्षण उपसंचालक स. बा. माळी, प्राचार्या डॉ. गीतांजली सालियन उपस्थित होते. पाहुण्याचा परिचय सूत्रसंचालिका अनघा जाधव यांनी करून दिला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रीराम महाजन व मेघा महाजन यांनी केले. तसेच शाळेच्या उपप्राचार्या अर्चना पुजारी, पर्यवेक्षिका निशा विश्वकर्मा, शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम महाजन यांनी पुस्तकांविषयी संपूर्ण माहिती त्यांच्या मनोगतात व्यक्त केली. हे पुस्तक माझे संपूर्ण जीवन, कला प्रवास संपन्नतेची व समाधानाची वाटचाल आहे. नवीन पिढी अक्षरांपासून दूर चालली आहे, त्यांना पुन्हा एकदा अक्षरांची ओळख व्हावी, त्यांचे अक्षर स्वच्छ, सुंदर, वळणदार व्हावे यासाठी या पुस्तकांची निर्मिती केली आहे, असे त्यांनी सांगितले. राम कस्तुरी यांनी अक्षर लेखनावर सुंदर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन मेघा महाजन यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद कुरणे, गजानन पाटील, राजू आवाडे, जितेंद्र आहिरराव, समाधान रोकडे यांनी अधिक परिश्रम घेतली.