कर्जतमधील ६५ गुणवंतांचा गौरव सोहळा
संस्कृती संवर्धनाचा उपक्रम
कर्जत, ता. १ (बातमीदार) : संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, कर्जत विभाग यांच्या वतीने नैतिक मूल्यशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत आयोजित परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी (ता. २८) अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, कर्जत येथे झाला. इयत्ता ४थी ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत कर्जत विभागातील २२ शाळांमधील तब्बल २,००० विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी प्रथम क्रमांक पटकावलेल्या ६५ विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिशु मंदिर, कडाव येथील विद्यार्थिनींच्या आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणाने झाली. अध्यक्ष म्हणून अनिल जोशी तर संस्थापक विश्वस्त मोहन सालेकर यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून अनुराधा भाटकर व साईनाथ श्रीखंडे उपस्थित होते. घर घर रामायण आणि जन जन रामायण या उपक्रमांतर्गत वाल्मिकी रामायणावरील ऑनलाइन परीक्षेची माहिती देण्यात आली.