पानेड-फणसवाडी रस्ता दुरवस्थेविरोधात आंदोलन
लेखी आश्वासनानंतर स्थगित
पेण, ता. १ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील पानेड ते फणसवाडी या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात सत्यशोधक सर्वोदय संघटना व ग्रामस्थांच्या वतीने पेण-खोपोली मार्गावरील हेटवणे कॉलनी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेत अलिबाग येथील उपअभियंता आर. के. चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
सुमारे ९.५ किलोमीटर लांबीच्या या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ऑक्टोबर २०२५ पासून काम सुरू आहे. मात्र, अद्याप संरक्षण भिंती, मोऱ्या, छोटे पूल तसेच काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण आहे. अर्धवट कामामुळे रस्त्यावर खड्डे व धुळीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना डोळ्यांचे आजार, कंबर व पाठदुखी यांसारख्या समस्या निर्माण होत असून, वाहनांचेही नुकसान होत आहे.
या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला. आंदोलनस्थळी भाजप युवा नेते ललित पाटील, पोलिस निरीक्षक संदीप बागुल, ज्युनियर इंजिनिअर शुभम चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी सपना सोनार, मंडळ अधिकारी किरण जुईकर, सरपंच गणेश गायकर, पोलिस पाटील केशव पाटील, ॲड. रोशन पाटील आदींसह शेकडो आंदोलक उपस्थित होते.