बंद गिरण्यांच्या गेटसमोर कामगारांची निदर्शने
शिवडी, ता. १ (बातमीदार) ः केंद्र सरकारने केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध डावलून ३८ कामगार कायदे रद्द करीत चार कामगार संहिता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज (ता. १) देशभरातील विविध उद्योगांमध्ये ‘काळा दिन’ पाळण्यात आला. संयुक्त लढा समितीच्या आवाहनानुसार राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आणि महाराष्ट्र इंटक यांच्या नेतृत्वाखाली विविध कारखान्यांतील तसेच बंद पडलेल्या गिरण्यांतील कामगारांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
मुंबईतील पोदार, टाटा, इंदू मिल क्रमांक ५, दिग्विजय अशा बंद गिरण्यांतील कामगारांनी गेटसमोर निदर्शने केली.
या संहितांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेच्या विरोधात कामगार संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर, महाराष्ट्र इंटक आणि संबंधित संघटनांचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल कामगारांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारने कामगारविरोधी चार कामगार संहिता मागे घेईपर्यंत विविध स्वरूपांमध्ये लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही कामगार नेत्यांनी व्यक्त केला.