गुंतवणुकीच्या नावाखाली लाखोंचा गंडा
तारापूर, ता. १ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील एका व्यक्तीची ऑनलाइन गुंतवणुकीच्या प्रलोभनाने तब्बल ७३ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभुराम भागुराम कुमावत हे अदाणी टाऊनशिप, डहाणू येते राहत असून त्यांना अज्ञात मोबाईलधारकाने ‘गोल्ड रश ग्लोबल कॅपिटल’ या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी एकूण ७३ लाख २१ हजार ६२० रुपये गुंतवले; मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता आरोपीने फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार ७ मार्च २०२५ पासून ते ३० जुलै २०२५ दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणुकीच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन डहाणू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण पवार यांनी केले आहे.