गतिरोधकांची तातडीची गरज
मुंबई-गोवा महामार्गावरील तीन बत्ती चौकात अपघातांच्या मालिका
माणगाव, ता. २ : माणगाव शहरातील जुने माणगाव येथील तीनबत्ती चौक अपघातप्रवण ठरत असून, येथे तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असून, अपघातांची मालिका सुरूच आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील काळ नदी पुलानंतरचा तीव्र उतार आणि वेग नियंत्रणाच्या साधनांचा अभाव यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होतो. परिणामी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गतवर्षी स्थानिक रहिवासी रफिक जामदार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला होता. त्यांनी महामार्ग रोखून आंदोलन करत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी अधिकाऱ्यांनी गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. परिणामी, अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
या मार्गावरून दररोज हजारो विद्यार्थी प्रवास करतात. द. ग. तटकरे महाविद्यालय, अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय, गीता तटकरे नर्सिंग कॉलेज आदी संस्थांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
महामार्ग अरुंद असल्यामुळे आणि वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या चौकात सतत कोंडी होत असते. काही वेळा तर वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत वाढतात. अशा परिस्थितीत एखादा अपघात झाला तर परिस्थिती आणखी भीषण बनते. ज्येष्ठ वकील व विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ यांनीही या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची गरज अधोरेखित केली.
चौकट
विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात
दररोज सुमारे पाच हजार विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. वेगवान वाहने, अरुंद रस्ता आणि कोंडी यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागतो. ज्येष्ठ वकील ॲड. विनोद घायाळ यांनीही तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली असून, उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.