ध्वनी, धुळीचा कहर
खदानी, क्रशरमुळे प्रदूषण; पर्यावरणाला बाधा
पालघर, ता. २ ः तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या खदानी, स्टोन क्रशर उद्योगांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. धूळ प्रदूषण, आवाजाचा त्रास, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडून प्रभावी कारवाईची मागणी होत आहे.
खदानी, क्रशरमधील दगडतोड तसेच वाहतुुकीमुळे परिसरात धुळीचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. शाळकरी मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. खदानीमधून होणारी सततची अति जड वाहनांच्या वाहतुकीने रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी, आवाज मर्यादा, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही ठिकाणी परवानगीच्या अटींचेही उल्लंघन होत आहे. त्यामुळे भविष्यात पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.
-----------------------------
- स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोग्य, पर्यावरणाशी खेळ सुरू आहे. नियमांचे काटेकोर पालन करून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
- प्रशासनाकडून लवकरच संयुक्त पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत; मात्र प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, याबाबत साशंकता आहे.
---------------------------
शेतीवर परिणाम
दगड खदानी, क्रशर असलेल्या ठिकाणी निघणारी धूळयुक्त पावडर वातावरणात पसरत आहे. आजूबाजूच्या शेती- बागायतींवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. झाडांच्या पानांवर या पावडरचा थर बसत असल्यामुळे झाडांना सूर्यकिरणे नीट मिळत नाहीत. हरित पोषक द्रव्य तयार होण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे; मात्र धुळीमुळे झाडांची वाढ खुंटणे, भाजीपाल्याची उत्पादन क्षमता कमी होणे, भातशेतीवर परिणाम होत आहे.
---------------------------------
खदानीबाबत परवानगी देताना प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना खदानचालकांना दिल्या आहेत. त्यातही नागरिकांना त्रास होईल, अशी कृती होत असेल तर कडक कारवाई केली जाईल.
- संदीप पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी
------------------------
क्रशरमधून प्रदूषण होत असेल, तर अशा ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी केली जाईल. प्रदूषण होत असल्यास तातडीने कारवाईची पावले उचलली जातील.
- वीरेंद्र सिंग, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.