तुर्भे, ता. २ (बातमीदार) : शहरातील झपाट्याने वाढत असलेल्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वायुप्रदूषण निर्मूलनासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम राबविण्याचा ठराव गुरुवारी (ता. २) सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. वाढती वाहतूक, रस्त्यांवरील धूळ, बांधकामांमधून होणारे प्रदूषण, तसेच कचरा जाळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला.
सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या १८ महिन्यांच्या कृती आराखड्यात शहरातील प्रदूषण ‘हॉटस्पॉट’ ओळखून त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचा प्रस्ताव आहे. विशेषतः ज्या भागात वाहतूक कोंडी जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, त्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील धूळ ही वायुप्रदूषणाची मोठी कारणीभूत असल्याने नियमित यांत्रिक रस्ते स्वच्छता, पाण्याची फवारणी आणि धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येतील. बांधकाम स्थळांवर ‘डस्ट कंट्रोल’ उपाययोजना सक्तीच्या करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकसकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, जुन्या व प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण, तसेच ‘ग्रीन मोबिलिटी’ला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन वाढविणे, सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्ग विकसित करणे यासारख्या उपायांचा समावेश आहे. पालिकेच्या या सर्वसमावेशक उपक्रमामुळे शहरातील वायुप्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होऊन नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कचरा जाळण्यासाठी बंदी
शहरात कचरा जाळण्याच्या घटनांवर पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
वैज्ञानिक अभ्यास करणार
नवी मुंबईबाहेरील औद्योगिक भागांतून शहरात येणाऱ्या प्रदूषणाचा वैज्ञानिक अभ्यास करून त्याचे पुरावे संबंधित राज्य व केंद्र सरकार, यंत्रणांकडे सादर केले जाणार आहेत. यामुळे बाह्य स्रोतांमधून होणाऱ्या प्रदूषणावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
अचूक मोजमाप शक्य
या कार्यक्रमांतर्गत शहरातील हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड यांसारख्या घातक प्रदूषकांचे प्रमाण निर्धारित मानकांखाली आणण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हवेच्या गुणवत्तेचे सातत्याने परीक्षण केले जाणार आहे. शहरात अत्याधुनिक एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन उभारण्यात येतील, ज्यामुळे विविध भागांतील प्रदूषणाचे अचूक मोजमाप व विश्लेषण शक्य होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.