अंबरनाथमध्ये ‘पं. दिनकर संगीत महोत्सवा’ची पर्वणी
नामवंत कलाकारांची उपस्थिती
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : कलार्पण क्रिएटिव्ह्स संस्थेच्या वतीने येत्या रविवारी (ता. ५) अंबरनाथमध्ये ‘पं. दिनकर संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. वडवली येथील रोटरी सभागृहात सायंकाळी ५.४५ वाजता हा कार्यक्रम रंगणार असून, यामध्ये नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
महोत्सवाची सुरुवात तबला वादनाने होणार असून, प्रग्नय हळदणकर आणि ओंकार भडंग यांची तबला जुगलबंदी रसिकांना अनुभवता येईल. त्यानंतरच्या सत्रात स्वराली पणशीकर-कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन सादर होईल. तिसऱ्या सत्रात विनायक चित्तार हे आपले एकल सतारवादन सादर करतील. महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ गायक डॉ. प्रवीण गावकर यांच्या सुश्राव्य गायनाने होणार आहे. महोत्सवात पं. शंतनू पणशीकर, प्रथमेश देवधर, सनद दळवी, संदीप मिश्रा आणि मयंक टेंग्से हे कलाकार साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रानडे करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अवधूत शेट्ये आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी उपस्थित राहणार आहेत.
विनामूल्य प्रवेश
अंबरनाथमधील संगीतप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असून, या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.