‘युवक अध्यक्ष चषक’ स्पर्धेला अदिती तटकरे यांची हजेरी
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : ‘युवक अध्यक्ष चषक २०२६’ नाईट क्रिकेट स्पर्धेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थित राहून महिलांच्या वाढत्या नेतृत्वाबाबत ठाम भूमिका मांडली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल मोरे यांच्या पुढाकारातून आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असून ३० मार्च ते २ एप्रिलदरम्यान सामने रंगले. तिसऱ्या दिवशी तटकरे यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, नमिता घारे, पुष्पा दगडे आदी उपस्थित होते. व्यासपीठावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक महिला आहेत; आता महिलाराज येणार, असे त्या म्हणाल्या. ४० वर्षांवरील खेळाडूंसाठी स्वतंत्र स्पर्धेचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
लकी ड्रॉमध्ये पल्लवी कोकजे यांनी पैठणी, संदेश शिर्के यांनी दुचाकी, तर मयुर उतेकरने एलईडी टीव्ही जिंकला. कार्यक्रमात महिलांचा सहभाग आणि युवकांचा उत्साह लक्षवेधी ठरला.