सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. तरीही काही फेरीवाले स्थानक परिसरात आपले बस्तान कायम मांडून आहेत. मात्र, आता पालिका आयुक्तांनी कडक भूमिका घेत ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकप्रमुख अरुण जगताप यांची तात्काळ उचलबांगडी केली आहे. या निर्णयामुळे पालिका प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा रंगली आहे.
पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील ग आणि फ प्रभाग हद्दीत फेरीवाल्यांविरोधात महिनाभरापासून अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या देखरेखीखाली ही कारवाई होत असताना, ग प्रभागात मात्र पालिका पथके निघताच फेरीवाले पुन्हा बसत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळेच या भागातील कारवाईबाबत संशय निर्माण झाला. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, फेरीवाल्यांना पाठीशी घालण्यात पथकप्रमुख अरुण जगताप यांची भूमिका असल्याचा अहवाल आयुक्त अभिनव गोयल यांच्यापर्यंत पोहोचला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री उशिरा जगताप यांना पदावरून हटवण्याचे आदेश देण्यात आले. त्यांची बदली घनकचरा विभागात करून त्यांना मूळ सफाई कामगार पदावर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ही कारवाई गोपनीय पद्धतीने पार पाडली. ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आदेश निर्गमित केले असून, जगताप यांच्या जागी श्रावण पाटील यांची नव्या पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, फेरीवाला मुक्त मोहिमेत पुढे आणखी कडक पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फ प्रभाग फेरीवालामुक्त
फ प्रभागात मात्र फेरीवाला हटाव मोहीम काटेकोरपणे राबवली जात असल्याचे चित्र आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत पथके तैनात ठेवून एकही फेरीवाला बसू न देण्याची दक्षता घेतली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.