वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ३ : महापालिकेचा कारभार तब्बल साडेतीन वर्षांनंतर पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. शहरातील प्रशासकीय निर्णयप्रक्रियेला गती मिळू लागली असली, तरी सभागृहातील कामकाजाच्या पद्धतीवरून नव्या आव्हानांची नोंद घेतली जात आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांसह काही अनुभवी लोकप्रतिनिधींनाही सभाशास्त्राचे नियम, सभागृहातील वर्तनसंहिता आणि कार्यपद्धती यांचे पुनःप्रशिक्षण आवश्यक असल्याचे चित्र पार पडलेल्या सर्वसाधारण सभांमधून स्पष्ट होत आहे.
जवळपास साडेतीन वर्षे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून शहर चालल्यानंतर ६ फेब्रुवारीला नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी पुन्हा सत्तेची सूत्रे स्वीकारली. ८५ नगरसेवकापैकी ४४ नगरसेवक नवीन आहेत. ५०% पेक्षा जास्त नगरसेवक नवीन आहेत. ८५ पैकी ४४ नगरसेवक नवीन आहेत. म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवक पहिल्यांदा निवडणूक आले आहेत. नव्या सभागृहात मोठ्या संख्येने प्रथमच निवडून आलेले सदस्य असल्याने लोकशाही प्रक्रियेबाबत उत्साह दिसत असला तरी सभागृह चालवण्याच्या नियमांबाबत आवश्यक परिपक्वता अद्याप निर्माण झालेली नसल्याचे अलीकडील बैठकीत प्रकर्षाने जाणवले. आतापर्यंत झालेल्या तीन सर्वसाधारण सभांमध्ये अनेकदा गोंधळाचे प्रसंग घडले. पीठासीन अधिकाऱ्यांची परवानगी न घेता अचानक बोलण्यास सुरुवात करणे, विषयावर बोलताना वेळेची मर्यादा ओलांडणे, एकाच वेळी दोन-तीन सदस्य उभे राहून चर्चा सुरू करणे, सूचनांनंतरही जागेवर न बसणे अशा प्रकारांमुळे सभागृहातील शिस्त विस्कळित होत असल्याचे दिसून आले.
काही वेळा पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून सदस्यांनी प्रतिवाद केल्याचेही पाहायला मिळाले. महिला सदस्य मुद्दे मांडत असताना इतर सदस्यांमध्ये सुरू असलेल्या गप्पा, मध्येच होणारे हस्तक्षेप आणि विषयांतरामुळे चर्चेचा दर्जा कमी होत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. काही प्रसंगी अपशब्दांचा वापर झाल्याने सभागृहाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
भाषिक शिस्तीचाही प्रश्न
सभागृहातील भाषिक शिस्तीचाही प्रश्न पुढे आला आहे. महापालिकेची कार्यवाही प्रामुख्याने मराठीतून अपेक्षित असताना काही सदस्यांनी कोणतीही परवानगी न घेता हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर केल्याचे निदर्शनास आले. नियमांनुसार मराठी येत नसल्यास पीठासीन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन इतर भाषेचा वापर करता येतो; मात्र मराठी येत असूनही परवानगीशिवाय भाषा बदलणे ही पद्धत अयोग्य मानली जात आहे.
असंसदीय शब्दांचा वापर
संवेदनशील विषयांवर बोलताना अचूक आणि सुसंगत शब्दप्रयोग अपेक्षित असताना काही ठिकाणी अयोग्य किंवा असंसदीय शब्द वापरले गेल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे विषयाचे गांभीर्य कमी होते, तसेच अधिकृत नोंदींमध्ये चुकीचे शब्द जातात, अशी चिंता प्रशासनातील जाणकार व्यक्त करत आहेत.
सभागृहाची शिस्त पाळणे सभागृहातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. सभागृहांमध्ये समाजशास्त्राचे नियम पाळले पाहिजे, यामध्ये सभागृह नेता, गटनेता, विरोधी पक्षनेता यांनी आपल्या गटातील सदस्यांना कसे नियमावली समजावून सांगितले पाहिजे.
- प्रकाश बिनेदार, सभागृह नेते, पनवेल पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.