खारेपाटात तलावाच्या पाण्याने फुलली फुलशेती
पाणीटंचाईवर मात करत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
पेण, ता. ५ (वार्ताहर) : ऐन उन्हाळ्यात रायगडमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना पेण तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकरीबंधूंनी प्रेरणादायी उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. ठाकूरबेडीतील प्रगतिशील शेतकरी नागेश ठाकूर यांनी तलावाच्या पाण्याने फुलशेती फुलवली आहे. यामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.
पेण तालुक्यातील खारेपाट विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. येथील शेतीचे होत असणारे नुकसान पाहता खारेपाट विभाग अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. मात्र, आशेचा किरण म्हणून ठाकूरबेडी येथील नागेश ठाकूर आणि गंगाधर ठाकूर या बंधूंनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तलावाच्या पाण्यापासून फलशेती, फुलशेती, हळद याचा यशस्वी प्रयोग केला आहे. तलावातील पाण्याचा नियोजनबद्ध योग्य आणि शाश्वत वापर करत शेतीत विविध फुलांची, फळांची लागवड केली.
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
सध्या बाजारात फुलांना मोठी मागणी असल्याने शेवंती, झेंडू यासह इतर फुले आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. फुलउत्पादनात अधिक नफा कसा मिळेल याकरिता ठाकूरबंधूंनी नवी संकल्पना राबवली. तालुक्यातील खारेपाट भागात तलावाच्या पाण्याने फुलशेती बहरली असल्याने या स्तुत्य उपक्रमात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खारेपाटातील मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान फुलशेतीसाठी पोषक असल्याने आणि बाजारात फुलांना चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा ही शेती नफायुक्त ठरत आहे. त्यातच लग्नसमारंभात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथेही फुलांना अधिक मागणी असून, आता बाजारात फुलांना १५० ते १८० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे.
- नागेश ठाकूर, प्रगतिशील शेतकरी, ठाकूरबेडी, पेण