बुलडाण्यातील शेतकऱ्याची फसवणूक
सव्वादोन लाखांचा टरबूज माल घेऊन व्यापारी फरार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : समाज माध्यमावरील जाहिरातीवर विश्वास ठेवून टरबूज विक्रीचा व्यवहार करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील बाळू पवार (वय ३४) शेतकऱ्याची दोन लाख २२ हजार ८८० रुपयांची फसवणूक झाली आहे. तर संबंधित व्यापाऱ्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रलोभन दाखवून माल ताब्यात घेतल्यानंतर पैसे न देता फरार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
बुलडाणा मेहकर तालुक्यातील जयताळा येथील शेतकरी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ मार्चला फेसबुकवरील ‘महाराष्ट्र टरबूज-खरबूज उत्पादक शेतकरी’ या ग्रुपवर टरबूज खरेदीसंदर्भातील जाहिरात बघितली. त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी राहुल पाटील नामक भामट्याने टरबुजाचा फोटो व साईज मागवून प्रति किलो १६ रुपये दराने माल खरेदी करण्याचे मान्य केले.
त्यानुसार पवार यांनी १८ मार्चला सुमारे १३,९३० किलो टरबूज माल ट्रकमधून ठाण्याकडे पाठवला. १९ मार्चला सकाळी ठाण्यात पोहोचल्यावर संबंधित व्यापाऱ्याने वागळे इस्टेट परिसरातील वजन काट्यावर मालाचे वजन करून घेतले. त्यानंतर ‘गोडाऊन जवळच आहे’ असे सांगत रस्त्याच्या कडेला माल उतरवून लहान टेम्पोमधून अन्य ठिकाणी पाठवण्यात आला.
माल उतरवल्यानंतर पेमेंटबाबत विचारणा केल्यावर आरोपीने ऑनलाइन व्यवहार करण्याचे सांगत शेतकऱ्याच्या भावाचा फोन पे क्रमांक घेतला. ‘प्रथम एक रुपया ट्रान्स्फर होईल, त्यानंतर संपूर्ण रक्कम जमा होईल,’ असे सांगून आरोपी तेथून निघून गेला; मात्र खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. त्यानंतर २४ तासांत पैसे येतील, असे आश्वासन देऊनही आरोपीने फोन उचलणे बंद केले. २० मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी राहुल पाटील याच्याविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात १६ रुपये एक किलोप्रमाणे दोन लाख २२ हजार ८८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.