महामार्गावर क्षुल्लक वादातून
टेम्पोचालकाला बेदम मारहाण
ढाबामालक, कामगारांकडून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
मनोर, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाडा खडकोना गावातील एका ढाब्यावर टेम्पोचालकाला बेदम मारहाण करीत पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीत गंभीर जखमी टेम्पोचालक दानिश खान (३०) याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ढाबामालक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरात राज्याच्या दिशेने जात असलेला टेम्पोचालक दानिश खान आणि त्याचा सहाय्यक सोनू पाल वाडा खडकोना गावाच्या हद्दीतील ढाब्यावर विश्रांतीसाठी थांबला होता. शीतपेयाचे पैसे देऊन टेम्पोजवळ पोहोचल्यावर टेम्पोची चावी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. चावी शोधण्यासाठी ढाब्याच्या काउंटरवर जाऊन ढाबामालकाकडे त्याने चावीबाबत विचारणा केली. ढाबामालकाने चावी दिल्यानंतर टेम्पोचालकाला मंदिरात २० रुपये दक्षिणा देण्यास सांगितले. सुट्टे पैसे नसल्याने दक्षिणा देणे शक्य नसल्याचे सांगितल्याने ढाबामालकाला राग आला. ढाबामालक आणि त्याच्या सोबतच्या आठ ते दहा कामगारांनी टेम्पोचालकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर काउंटरच्या शेजारच्या खोलीत नेवून टी-शर्ट काढत लाकडी काठी आणि चामडी पट्ट्याने मारहाण केली. त्यानंतर ढाबामालकाने ‘आज तू यहासे जींदा बाहर नहीं जायेगा’ असे सांगून टेम्पोचालकाच्या अंगावर तसेच गुप्तांगावर पेट्रोल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी टेम्पोचालकाचा सहाय्यक सोनू पाल सोडवण्यासाठी आला असता त्यालाही ढाबामालक व कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी त्याने मदतीसाठी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळाने ढाब्यावर पोहोचलेल्या पोलिसांनी टेम्पोचालकाची ढाबामालक आणि कामगारांच्या तावडीतून सुटका केली. गंभीर जखमी असलेल्या टेम्पोचालकाला उपचारासाठी मनोरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
याप्रकरणी टेम्पोचालकाने मनोर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ढाबामालक आणि कामगारांविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उशिरा रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.