सीबीएसई शाळांतील मराठी सक्तीचा विषय अधांतरी
दहावीतील विद्यार्थ्यांना मराठीचा विषय घेण्यासाठी केले जाते दुर्लक्ष
संजीव भागवत
मुंबई, ता. ५ : राज्यातील कार्यरत असलेल्या केंद्रीय मंडळाच्या आणि विशेषत: सीबीएसई आदी मंडळांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अनिवार्य करण्याचा कायदा राज्यात लागू असतानाही त्याची अजूनही नीट अंमलबजावणी होत नसल्याची माहिती समोर आली आहे. यात अर्ध्याही विद्यार्थ्यांना मराठीचा विषय देण्यात आला नसल्याने मराठी विषयाला थेट डावलेले जात असल्याचेही दिसून आले आहे.
राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) राज्यात एकूण एक हजार ४४ शाळा असून, यामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक दहावीच्या परीक्षेला एकूण एक लाख २७ हजार २८१ विद्यार्थी बसले होते. यात केवळ ३४ हजार ५१४ विद्यार्थ्यांना मराठीचा विषय देण्यात आला होता, तर हिंदीच्या विषयाला ६६ हजार ९८५ विद्यार्थी होते, अशी माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. दरम्यान, सीबीएसईच्या राज्यातील शाळांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी मराठी असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी भाषेचा वापर अपेक्षित असतो. त्यात इंग्रजी किंवा मराठी भाषेतून न शिकवता हिंदी भाषेतून शिकविले जाते, यातूनही मराठीकडे दुर्लक्ष केले जाते. मराठी विषयांसाठी शिक्षकांच्या नेमणुका करणे बंधनकारक असताना बहुतांश शाळांमध्ये त्या करण्यात आल्याचेही दिसून आले आहे.
--------------
असे आहे मराठी सक्तीचे धोरण
पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा द्वितीय विषय सक्तीचा करण्यात आला आहे. यासाठी ३० ऑगस्ट २०२१ रोजी सुधारित आदेशही जारी करण्यात आला होता.
------------
एक लाखाच्या दंडाची तरतूद
शालेय शिक्षण विभागाच्या धोरणानुसार इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय अनिवार्य आहे. या कायद्यांच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळेच्या व्यवस्थापकीय संचालकाला किंवा अन्य संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. मात्र, मागील तीन वर्षांत एकाही शाळेवर कारवाई झाली नाही.
------
विद्यार्थ्यांवर दुहेरी अन्याय
सीबीएसईच्या शाळांमध्ये एकीकडे विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यासाठी शाळा प्रवृत्त करत नाहीत, तर जे विद्यार्थी दुसरी भाषा मराठी घेतात, तर मराठीचा पेपर द्यावा लागतो. जे विद्यार्थी दुसरी भाषा हिंदी निवडतात, त्यांना मराठीचा पेपर द्यावा लागत नाही. तर मराठीच्या विद्यार्थ्यांना हिंदी पेपरही द्यावा लागतो.
–
वर्षे एकूण विद्यार्थी मराठीतील विद्यार्थी हिंदीतील विद्यार्थी
२०२३-२४ १०७७८० २१८५१ ५९०४६
२०२४-२५ ११७४४५ ३११६० ६२०६६
२०२५-२६ १२७२८१ ३४५१४ ६६९८५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.