पुन्हा बेरोजगारीशी सामना
डहाणूतील खासगी प्रवासी वाहतुकीला फटका
कासा, ता. ६ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यात अनेक तरुणांनी कर्ज घेऊन रिक्षा, टेम्पोसारखी प्रवासी वाहने खरेदी केली होती. या व्यवसायातून रोजगार उपलब्ध झाला. मात्र, परिस्थिती पूर्णपणे बदलली असून, ग्रामीण भागातील महिला प्रवासी एसटीकडे वळल्याने खासगी प्रवासी वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
काही वर्षांपासून प्रवासी वाहन व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या वर्षापासून एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत लागू झाल्याने मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासी एसटीकडे वळल्या आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी वाहनांचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. याचा थेट फटका उत्पन्नावर झाला आहे. पूर्वी दिवसाला ८०० ते १००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणाऱ्या चालकांना एक फेरीसुद्धा होत नाही. दिवसभर थांबून केवळ ३०० रुपये मिळणे कठीण झाले आहे. परिणामी, कुटुंबाचा खर्च, बँकेचे हप्ते भरण्याचा दुहेरी ताण चालकांवर आला आहे.
--------------------------------
हप्ते वसुलीसाठी दबाव
- चारोटी नाक्यावरून चारोटी-डहाणू, चारोटी-वापी तसेच चारोटी-घोडबंदर मार्गांवर शेकडो प्रवासी, वाहनचालक कार्यरत आहेत. मात्र, वाहनांची संख्या वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे.
- महामार्गांवरील निकृष्ट काँक्रीट कामामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, प्रवास करण्यास प्रवासी टाळाटाळ करत आहेत. त्यात इंधन, सीएनजी दरात झालेल्या वाढीमुळे मोठा आर्थिक बोजा वाढला आहे.
- अनेक वाहनचालकांनी कर्ज काढून वाहने घेतल्याने दरमहा हप्ते भरण्याची जबाबदारी आहे. मात्र, सध्याच्या कमी उत्पन्नामुळे अनेकांचे हप्ते थकल्याने वसुलीसाठी दबाव वाढत आहे.
----------------------
कामधंदा नसल्याने कर्ज काढून प्रवासी रिक्षा घेतली. सुरुवातीला चांगले चालले, पण आता प्रवासी कमी झाले आहेत. एसटी बससाठीच्या सवलती, महामार्गावरील कामामुळे कोंडीने व्यवसाय पूर्णपणे मंदावला आहे.
- रवी डोकफोडे, वाहनचालक
------------------------
प्रवासी वाहने वाढली, इंधन, सीएनजी दरही वाढले. त्यात नागरिक दुचाकी वापरू लागल्याने प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे हा व्यवसाय करणे अवघड झाले असून, बेरोजगारीची वेळ आली आहे.
- रघुनाथ पाटील, वाहनमालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.