बेकायदा उत्खननाचा कहर
कर्जत तालुक्यात पर्यावरणासह महसुलालाही फटका; वन विभागाचे दुर्लक्ष
कर्जत, ता. ६ (बातमीदार) : कर्जत तालुक्यात बेकायदा उत्खननाचा अक्षरशः कहर सुरू असून, डोंगररांगा व टेकड्यांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. नियम धाब्यावर बसवून ग्रीन झोनमध्येही सर्रास उत्खनन सुरू असून, पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्प प्रमाणात रॉयल्टी दाखवून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होत असून, प्रशासनातील काही घटकांच्या संगनमतातून महसूल बुडवला जात असल्याचीही चर्चा रंगली आहे.
मौजे चिंचवली परिसरात कर्जत-नेरळ मार्गालगत रायगड हॉस्पिटलजवळ तसेच भाऊसाहेब राऊत विद्यालयासमोरील डोंगरभागात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यामुळे परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून, जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे. पाली-भूतिवली धरण परिसरातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे.
नागरिकांनी तहसीलदार कार्यालयात फोटो व लोकेशनसह तक्रार दाखल केली असून, प्रत्यक्ष उत्खनन आणि भरलेली रॉयल्टी यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, वन विभाग आणि महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांसाठी भराव मिळवण्यासाठी डोंगरांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. यामुळे भविष्यात हिरवागार कर्जत काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे. पर्यटन, फार्महाउस आणि रिसॉर्ट व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
चौकट
महसूल फसवणूक गंभीर
बेकायदा उत्खननात शासनाच्या महसुलात होत असलेली मोठी तूट ही सर्वात चिंताजनक बाब आहे. उत्खननाचे प्रत्यक्ष प्रमाण जास्त असतानाही कमी रॉयल्टी भरून शासनाची फसवणूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असून, प्रामाणिक व्यवसायिकांनाही अन्याय सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
कोट
बेकायदा उत्खननावर काही ठिकाणी कारवाई केली आहे. पळसदरी येथे अलीकडे गुन्हासुद्धा दाखल केला आहे. कुणीही विनापरवाना, महसूल बुडवून उत्खनन करीत असल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- धनंजय जाधव, तहसीलदार कर्जत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.