नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून ठाण्यात तणाव
गुन्हा दाखल करण्याची मागणी; सलोखा बिघडवण्याचा आरोप
ठाणे, ता. ६ : मुंब्रा येथील हिंदू संमेलनात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज केली आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्ये करणे आणि संविधानिक मूल्यांचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात नौपाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली तसेच राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रधान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुंब्रा-कौसा परिसरात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मंत्री राणे यांनी मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातही चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. मनोज प्रधान म्हणाले, ‘मुंब्रा-कौसा परिसरात हिंदू आणि मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून सलोख्याने नांदत आहेत. अशा ठिकाणी बाहेरून येऊन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न गंभीर आहे.’ मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व समाजांना समान न्याय देण्याची जबाबदारी स्वीकारली जाते. मात्र, प्रत्यक्ष कृतीत त्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या वेळी स्थानिक पदाधिकारी मनीषा भगत यांनीही प्रतिक्रिया देताना, ‘मुंब्रा परिसरात सर्व समाज एकत्र राहतो. येथे कोणत्याही प्रकारे भांडणे लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,’ असा इशारा दिला. दरम्यान, मुंब्रा नाव बदलाच्या चर्चांवर बोलताना, ‘स्थानिकांच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मात्र, शहरात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांना ठाम विरोध केला जाईल,’ असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.