प्रवासातून स्वावलंबन
एसटीच्या विविध उपक्रमांचा प्रभाव
महाराष्ट्र शासन आणि एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुविधा, सामाजिक सवलती आणि कर्मचारी कल्याणासाठी अनेक दूरदृष्टीच्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, कर्मचारी वेतनवाढ, बस स्थानकांचे स्वच्छता-सौंदर्यीकरण, डिजिटल सेवा आणि विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन व मोफत वाचनालय हे उपक्रम सामाजिक समता, स्वावलंबन आणि राज्याच्या आर्थिक-सामाजिक विकासाला चालना देणारे आहेत. या योजनांमुळे केवळ प्रवास सुलभ होत नाही, तर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे जीवनमान उंचावले जाते, डिजिटल सुविधांचा लाभ मिळतो आणि एसटी महामंडळाचे आर्थिक स्थैर्यदेखील वाढते. त्यामुळे हे उपक्रम फक्त परिवहन सुधारणा नसून, महाराष्ट्राच्या विकासाच्या रथाची बहुमूल्य चाके ठरतात. या योजनांमुळे एसटी महामंडळ फक्त प्रवासासाठीच नव्हे, तर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचे जीवनमान उंचावणारे आणि राज्याच्या आर्थिक-सामाजिक विकासाला चालना देणारे एक महत्त्वाचे माध्यम बनले आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मुलाखतीतून या उपक्रमांचा वास्तवातील प्रभाव, प्रवाशांवर पडणारा परिणाम आणि भविष्यातील दृष्टिकोन याबाबत सविस्तर घेतलेला हा आढावा.
एसटीमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात आहे, याचा नेमका परिणाम काय झाला?
महाराष्ट्राच्या विकासाच्या रथाची दोन चाके म्हणजे स्त्री आणि पुरुष. या नारीशक्तीचा सन्मान आणि सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘महिला सन्मान योजना’ ही केवळ आर्थिक सवलत नसून, स्त्रीच्या आत्मसन्मानाला आणि स्वावलंबनाला बळ देणारी दूरदृष्टीची योजना आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर महिला, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील नोकरीपेक्षा महिलांना प्रवास अधिक सुलभ झाला आहे. पूर्वी खर्चामुळे मर्यादित राहणारा त्यांचा प्रवास आता अधिक वाढला आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांसाठी महिलांचा प्रवास वाढल्याने राज्याच्या एकूण सामाजिक-आर्थिक विकासाला गती मिळत आहे. २०२३-२४च्या अर्थसंकल्पापासून ही योजना लागू करण्यात आली असून, १७ मार्च २०२३ पासून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. सध्या दररोज सुमारे २० ते २२ लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, हे या योजनेचे यश आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीबाबत आपण काय सांगाल?
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने २६ ऑगस्ट २०२२पासून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा सुरू केली आहे. ही योजना म्हणजे केवळ सवलत नसून, समाजातील ज्येष्ठ घटकांप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा उपक्रम आहे. या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यातील अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करता येत आहेत. तीर्थयात्रा, नातवंडांना भेटणे, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे या सर्व गोष्टी आता अधिक सहज शक्य झाल्या आहेत. ही योजना त्यांच्या जीवनात आनंद, आत्मसन्मान आणि स्वावलंबन वाढवणारी ठरली आहे.
कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी प्रशासनाने काय पावले उचलली आहेत?
एसटीची लाल परी ही केवळ बस नसून लाखो कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. त्यांच्या हितासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत सरसकट ६,५०० रुपयांची वेतनवाढ लागू केली आहे. यापूर्वी टप्प्याटप्प्याने अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार रुपयांची वाढ देण्याचा निर्णय होता; मात्र तो बदलून एकसमान वाढ देण्यात आली. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढले असून, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे. यामुळे कर्मचारी अधिक प्रेरित होऊन सेवा देत आहेत, ज्याचा थेट परिणाम प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेवर दिसून येत आहे.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’बद्दल काय सांगाल?
एसटी बस स्थानके ही सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यामुळे त्यांची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण हा आमचा प्राधान्यक्रम आहे. २०२३-२४ मध्ये सुरू केलेल्या या अभियानाचा दुसरा टप्पा २३ जानेवारी २०२५ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व बस स्थानकांवर नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी वातावरण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यामुळे एसटीची प्रतिमा अधिक सकारात्मक झाली आहे.
एसटीच्या जागांचा ‘पीपीपी’ तत्त्वावर कशाप्रकारे विकास केला जात आहे?
एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात ‘पीपीपी’ तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय हा अत्यंत दूरदृष्टीचा आहे. यामध्ये बस स्थानके आणि डेपो परिसरात आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स, पार्किंग सुविधा आणि इतर सोयी उभारल्या जातील. या विकासामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील तसेच महामंडळाला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. परिणामी एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबनाकडे वाटचाल करेल.
‘छावा ॲप’च्या सुविधा काय आहेत?
डिजिटल युगाशी सुसंगत पाऊल टाकत राज्य शासन ‘छावा ॲप’ सुरू करीत आहे. या ॲपद्वारे एसटी बस, रिक्षा, टॅक्सी आणि ई-बस सेवा एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील.
यामुळे प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक आणि सोईस्कर सेवा मिळेल. विशेषतः ग्रामीण आणि अर्धशहरी भागात डिजिटल सुविधा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
७५ बस स्थानकांवर मोफत वाचनालय सुरू करण्याबाबत काय प्रगती आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वर्षानिमित्त राज्यातील ७५ बस स्थानकांवर ‘मोफत वाचन कट्टा’ सुरू करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून प्रवाशांना वेळेचा सदुपयोग करता येईल. वृत्तपत्रे, स्पर्धा परीक्षा साहित्य आणि विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त हा उपक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.
तिकीट विक्रीव्यतिरिक्त एसटीचे उत्पन्नाचे स्रोत कोणते?
एसटी महामंडळाने आर्थिक बळकटीसाठी विविध पर्यायांचा अवलंब केला आहे. यामध्ये किरकोळ इंधन विक्री, स्क्रॅपिंग सेंटर उभारणी, नवीन जाहिरात धोरण (सुमारे २५० कोटींचा महसूल अपेक्षित) आणि सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमुळे महामंडळाचे उत्पन्न वाढून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत आहे. भविष्यात आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
विद्यार्थ्यांसाठीच्या हेल्पलाइनबद्दल काय सांगाल?
एसटी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १८००२२१२५१ ही विशेष हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. बस उशिरा येणे, सेवा रद्द होणे किंवा इतर अडचणी आल्यास या हेल्पलाइनवर त्वरित प्रतिसाद दिला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियमित झाला असून, पालकांचाही विश्वास वाढला आहे.
एसटीत नोकर भरती केव्हा केली जाणार आहे?
एसटी महामंडळात लवकरच चालक, वाहक आणि इतर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती राज्यातील तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार आहे. या भरतीमुळे सेवा अधिक गतिमान, कार्यक्षम आणि प्रवासीकेंद्रित होईल. एसटीची सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
एसटी महामंडळ हे महाराष्ट्राच्या जनतेचे जीवनवाहक साधन आहे. प्रवाशांच्या सोयी, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि आर्थिक स्वावलंबन या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत आधुनिकतेकडे वाटचाल करणारी एसटी ही ‘जनतेची सेवा’ या ध्येयाने पुढे जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.