शॉर्टसर्किटने दुकानाची राखरांगोळी
पायरवाडी गावातील घटना, लाखोंचे नुकसान
मोखाडा, ता. ७ (बातमीदार) ः धामणशेत-कोशीमशेत ग्रामपंचायत हद्दीतील पायरवाडीत शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत किराणा दुकान खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तीव्रता अधिक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दुकानातील किराणा माल, घरातील धान्य, कपडे तसेच सुमारे ७० हजारांची रोख रक्कम जळाली आहे. या आगीत अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले आहे.
-------------------
धोडी कुटुंबावर आघात
या संकटामुळे धोडी कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे. पंचनामा करून शासकीय मदत देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तर तलाठ्यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून अहवालानुसार कार्यवाही केली जाईल, असे नायब तहसीलदार बाळाराम भला यांनी सांगितले.