कुर्ला स्थानकातील स्तनपान केंद्र सुरू
धारावी, ता. ७ (बातमीदार) : लहान बाळांसह प्रवास करणाऱ्या मातांना भेडसावणाऱ्या अडचणींची दखल घेत कुर्ला स्थानकावरील स्तनपान केंद्र अखेर सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी हे केंद्र बंदावस्थेत असल्याने महिला प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नव्हता. यासंदर्भात ‘सकाळ’च्या ३० मार्चच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून हे केंद्र वापरासाठी खुले केले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. कमी खर्च आणि जलद प्रवासामुळे महिलाही लहान बाळांसह मोठ्या प्रमाणात लोकलचा वापर करतात. अशा वेळी बाळाला भूक लागल्यास सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणे अनेक महिलांसाठी अवघड आणि अस्वस्थ करणारे ठरते.
या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मातांसाठी कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर स्तनपान केंद्र उभारले होते. मात्र, ते बंद असल्याने त्याचा उपयोग होत नव्हता आणि प्रवाशांमध्ये नाराजी होती. सुविधा उभारून ती बंद ठेवण्यापेक्षा चालू स्थितीत ठेवावी, अशी संतप्त प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी व्यक्त केली होती.
आता हे केंद्र पुन्हा सुरू झाल्याने महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, अशा सुविधा नियमितपणे कार्यरत ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.