नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या विकृत आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. विवेक गजानन कदम (वय ३५) याच्याविरोधात विनयभंग, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेतील अल्पवयीन मुलगी शनिवारी (ता. ४) सकाळी रस्त्याने चालत जात होती. या वेळी संशयिताने तिच्या मागून येत तिचे नाव विचारत तिच्यासोबत अश्लील कृत्य करून पलायन केले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने घडल्या प्रकाराची घरी माहिती दिल्यानंतर त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचे निरीक्षण केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. तो घणसोलीत राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने गुह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.