डहाणू-चारोटी राज्यमार्गाचे काम ठप्प; वाहनचालक संतप्त
कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू-चारोटी राज्यमार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, सध्या अनेक ठिकाणचे काम ठप्प अवस्थेत असल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दुरुस्ती व गटारांच्या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, पुढील कामाला सुरुवात न झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कंत्राटदाराला वृक्षतोडीची परवानगी नसल्याने काही काळ काम मंदावले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्यानंतर चार ते आठ दिवसांत अनेक ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. तरीदेखील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग न आल्याने परिस्थिती जैसे थेच आहे. परिणामी, अर्धवट खोदलेला रस्ता, उखडलेले भाग आणि धुळीचे प्रमाण वाढल्याने दुचाकी व इतर वाहनचालकांना प्रवास करताना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धुळीमुळे दृश्यमानता कमी होत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, चारोटी ते आशागड यादरम्यान वृक्षतोड व रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे अवजड वाहतूक कमी झाली असली तरी प्रत्यक्षात रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती मिळालेली दिसत नाही.
पावसाळा अवघ्या दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपला असताना हा मार्ग अर्धवटच राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय होऊन पाणी साचण्याची शक्यता असून, प्रवास अधिकच धोकादायक ठरणार आहे. डहाणू तालुक्यातील खेड्यापाड्यातील नागरिक, शेतकरी तसेच शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा राज्य मार्ग तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने आवश्यक त्या अटी-शर्ती सुलभ करून कामाला गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
------------------
कोट :
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी गटारांचे काम आणि खोदकाम सुरू असल्याने वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने हा राज्यमार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा.
- प्रणय मेहेर, सामाजिक कार्यकर्ता व उपजिल्हाप्रमुख, शिवसेना