गॅसटंचाईचा डबासेवा, खाणावळींना फटका
सिलिंडरसाठी २५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी; सेवा विस्कळित
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. ७ ः युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅसटंचाईचा फटका आता शहरातील घरगुती जेवण डबासेवा व खाणावळ व्यवसायाला बसू लागला आहे. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल २५ दिवसांचा कालावधी लागत असून, नोंदणी केल्यानंतरही सिलिंडर उशिरा मिळत असल्याने अनेक महिलांच्या उपजीविकेवर संकट कोसळले आहे.
घरगुती डबासेवा चालवणाऱ्या महिलांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. दररोज शेकडो ग्राहकांसाठी स्वयंपाक करणाऱ्या या महिलांना गॅसअभावी कामकाज सांभाळणे कठीण झाले आहे. परिणामी काहींना ग्राहकसंख्या कमी करावी लागत आहे, तर काहींनी तात्पुरती सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
घाटकोपर रमाबाईनगर येथे राहणाऱ्या सरिता बनसोडे यांनी वर्षभरापूर्वी ग्राहकांना घरगुती जेवण बनवून देण्यासाठीच छोटा व्यवसाय सुरू केला. १७ ते १८ ग्राहकांसाठी त्या दररोज डबा बनवून देत. मात्र गेल्या महिनाभरापासून सुरू आलेल्या गॅसटंचाईमुळे बनसोडे यांचे अर्धे ग्राहक कमी झाले आहेत. मोजक्या ग्राहकांवर त्यांचा हा व्यवसाय सध्या सुरू आहे. युद्धाचे हे सावट असेच सुरू राहिले तर माझा पूर्ण व्यवसायच ठप्प होईल, अशी चिंता सरिता बनसोडे यांनी व्यक्त केली.
खैरानी रोड येथे राहणारे भरत देसाई यांचा १८ वर्षांपासून खाणावळीचा व्यवसाय सुरू आहे. ५० ते ६० ग्राहकांसाठी ते घरगुती जेवण बनवून डिलिव्हरी करतात. मात्र सध्या गॅसटंचाईचा त्यांच्या या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसते. सध्या त्यांनी स्वतःहून २५ ग्राहक कमी केले असल्याचे सांगितले. शेगडी इलेक्ट्रिक असून त्याचा वापर करता येत नाही. त्यावर चपात्या बनवता येत नाहीत. ग्राहकांना रोज चपाती-भाजी बनवून द्यावी लागते. त्यासाठी गॅस हवाच. पूर्वी स्टोव्हवर जेवण बनत होते. आता स्टोव्हदेखील मिळत नाही, असे भरत देसाई म्हणाले. गॅस वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढत्या खर्चात आणि अनियमित गॅसपुरवठ्यामुळे व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे.
आमचा पूर्ण व्यवसाय गॅसवर अवलंबून आहे. सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांना वेळेवर जेवण देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक दुसरीकडे वळत आहेत.
- सरिता बनसोडे, खाणावळ चालक
ग्राहक कमी करण्याची वेळ
गॅस उशिरा मिळत असल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. आम्ही स्वतःच ग्राहक कमी केले आहेत. इतर साधने असली तरी इलेक्ट्रिक शेगडीवर चपात्या बनवता येत नाहीत. त्यासाठी गॅसच हवा. ५० ते ६० ग्राहकांना आम्ही जेवण डबा बनवून देत असतो. आता सध्या आम्ही २५ ते ३० जणांनाच डब्बा बनवून देत हा व्यवसाय सुरू ठेवला असल्याचे भरत देसाई यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.