पालघर जिल्हा डिजिटल जनगणनेसाठी सज्ज
तीनदिवसीय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पालघर, ता. ७ (बातमीदार) : देशाच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना २०२७च्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात क्षेत्रीय प्रशिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनगणना कशी प्रभावीपणे पार पाडावी याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणात डिजिटल डेटा एन्ट्री, मोबाईल ॲपचा वापर तसेच (सीएमएमएस) पोर्टलवरील कामकाज याबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. जनगणना कार्यालयातील मिलिंद पाटील, के. एम. भंडारी आणि संतोष वाघ यांनी सादरीकरणाद्वारे घरयादी व घरगणना प्रक्रिया तसेच प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्तीबाबत मार्गदर्शन केले. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असल्याने मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन, डेटा अचूकता आणि नागरिकांशी संवाद साधताना आवश्यक काळजी यावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या जनगणना प्रक्रियेची धुरा जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी रणजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
जनगणना २०२७ ही देशाची १६वी जनगणना असून, ती अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. यामध्ये प्रथमच नागरिकांना स्वयंगणना करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा पर्याय १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत उपलब्ध असेल. त्यानंतर १६ मे ते १४ जूनदरम्यान घरयादी व घरगणना क्षेत्रीय कार्य राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांची सविस्तर सामाजिक व आर्थिक माहिती संकलित केली जाणार आहे.
डिजिटल माध्यमातून जलद माहिती प्रसार, जात प्रगणना, स्वगणना पोर्टल आणि अचूक डेटा संकलन ही या जनगणनेची ठळक वैशिष्ट्ये ठरणार आहेत.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.