शिंदेंमुळे कामाला गती मिळून प्रकल्प पूर्ण होईल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे-बोरिवली हा बोगदा प्रकल्प राज्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची सुरुवात ठाण्यातून होत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील ठाण्यातील असल्याने त्यांचे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष राहणार आहे. त्यामुळे कामाला गती मिळून प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात व्यक्त केला.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाची मंगळवारी (ता. ७) टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) लाँचिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाची लांबी ११.८४ किमी असून, त्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरिवलीकडून ५.७५ किमी आणि ठाण्याकडून सुमारे ६.७५ किमी बोगदा खोदण्यात येणार आहे. सुमारे १६ हजार ६६४ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या बोगद्यात दोन स्वतंत्र वाहतूक मार्ग असून, प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर सुरक्षा क्रॉस पॅसेजेस तयार करण्यात येणार असून, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे. एमएमआरडीएमार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
चार टीबीएम यंत्रे वापरणार
प्रकल्पासाठी ठाण्यातून ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ अशी नावे असलेली टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. ‘नायक’ हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून, तर ‘अर्जुन’ हे झाडाच्या नावावरून देण्यात आले आहे. एकूण चार अत्याधुनिक आणि मोठ्या व्यासाची टीबीएम यंत्रे या संपूर्ण कामासाठी वापरण्यात येणार आहेत. काम करताना नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे.
जैवविविधतेसाठी वृक्षारोपण करणार
बोगद्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या प्रकल्पात जैवविविधतेवर परिणाम होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तोडण्यात आलेल्या सुमारे ११ हजार झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केले जाणार आहे.
..........................
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य - एकनाथ शिंदे
‘२०२४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची काळजी घेणे मोठे आव्हान होते; परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिली. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास अवघ्या १५ मिनिटांत शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून, ‘गेम चेंजर’ प्रकल्प ठरेल. तसेच या प्रकल्पामुळे रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही याची हमीदेखील शिंदे यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.