पूर्व-पश्चिम वाहतूक सुरळीत होणार ः मुख्यमंत्री
मेट्रोचे लोकार्पण; पॉड टॅक्सीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील वाहतूक कोंडी फोडतानाच प्रवाशांना गारेगार आणि वाहतूक कोंडीशिवाय प्रवास करता यावा, म्हणून एमएमआरडीएकडून वेगवेगळे वाहतूक प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून या मेट्रो-२बी मार्गिकेच्या डायमंड गार्डन-मंडाळे या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण झाले. तसेच कुर्ला-वांद्रेदरम्यान पाॅड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, त्याचेही भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे पुढील काळात पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, असा विश्वास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
एमएमआरडीएकडून उभारलेल्या मेट्रो-२बी अंधेरी डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रोच्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाळे या टप्प्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या जोडणीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले असून, डी. एन. नगर ते सारस्वत नगर आणि सारस्वत नगर ते चेंबूर हे दोन्ही टप्पे लवकरच पूर्ण केले जातील. त्यामुळे मुंबईकरांना सहजपणे पूर्व-पश्चिम उपनगरात प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी स्थानकातील सोयीसुविधांची पाहणी करतानाच मेट्रोने प्रवास केला. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार तुकाराम काते, सना मलिक, मंगेश कुडाळकर, एमएमआरडीएचे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.
...
मुंबई दुसऱ्या स्थानावर
मुंबईसह एमएमआरमध्ये तब्बल ३३८ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत तब्बल १०१ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यन्वित झाल्याने मुंबई मेट्रोच्या जाळ्याचा विचार करता देशात दुसऱ्या स्थानावर पोहोचली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिल्लीचा पहिला क्रमांक आहे, तर कोलकाता तिसऱ्या स्थानावर आहे.
...
लोकलचा भार कमी होणार!
सध्या मुंबईसह परिसरातील प्रवाशांचा भार लोकल ट्रेनवर पडत असून, दररोज ९० लाख लोक प्रवास करतात. मेट्रोचे जाळे पूर्ण उभारणी झाल्यानंतर दररोज ७० लाख प्रवासी मेट्रो प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे लोकलवरचा भार कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
...
भुयारी मार्ग
वाहतूक कोंडीने मुंबईचा मंदावलेला वेग वाढवण्यासाठी लवकरच वांद्रे सी लिंकपासून बीकेसीमध्ये बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारला जाईल. तसेच बुलेट ट्रेन स्थानकापासून त्याची एक मार्गिका मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने, तर दुसरी मार्गिका कुर्ल्याकडे जाईल. तसेच विमानतळाच्या दिशेने गेलेली मार्गिका पुढे पश्चिमेकडील कोस्टल रोडला जोडण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...
२० महिन्यांत पाॅड टॅक्सी सेवेत!
कुर्ला-वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान ८.८५ किमी लांबीचा स्वयंचलित पाॅड टॅक्सी प्रकल्प उभारला जाणार असून, त्याचा पहिला टप्पा पुढील २० महिन्यांत पूर्ण केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या उभारणीत काही अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला करतानाच एकही दिवस काम थांबवू नका, असे बजावले. बीकेसी कनेक्टिव्हिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प केला जाणार असल्याने त्याचा एमएमआरडीए अथवा सरकारवर कोणताही भार पडणार नाही.
...
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण लांबी - ८.८५ किमी
- एकूण स्थानके - २२
पहिला टप्पा
- लांबी - ३.३६ किमी असून, कुर्ला, एलबीएस मार्ग, एमएमआरडीए पे ॲण्ड पार्क (जी ब्लाॅक), बीडीबी गेट ११, वांद्रे पूर्व, कलानगर, जुनी एमएमआरडीए इमारत, उत्पादन शुल्क विभाग ही स्थानके असतील
- सुमारे २०० मीटरवर वातानुकूलित स्थानके असणार
- एआय अधारित चालकविरहित पाॅड धावणार
- ताशी ४० किमी वेग
- मेट्रो-२ बी आणि मेट्रो-३ शी जोडणी
- ३.९ मीटर लांबी, २.०१ मीटर रुंदीच्या पाॅडमध्ये सहा प्रवासी बसू शकणार
- २०३१पर्यंत सर्व २२ स्थानके कार्यरत होणार
...
आमचा पाय ॲक्सलेटरवर ः एकनाथ शिंदे
मुंबईत वेगवेगळे विकास प्रकल्प हाती घेणे आवश्यक असतानाही महाविकास आघाडी सरकारने सुरू असलेल्या प्रकल्पांना ब्रेक लावला होता; मात्र आम्ही महायुती म्हणून सत्तेत आल्यापासून विकास प्रकल्प हाती घेतले असून, त्यापैकी आता काही पूर्ण होताना दिसत आहेत, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आमचा पाय ब्रेकवर नाही, तर ॲक्सलेटरवर असल्याचे सांगितले. तसेच बीकेसीत होऊ घातलेला पाॅड टॅक्सी हा देशातील पहिला प्रकल्प असून, त्याचा सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईची कनेक्टिव्हिटी सुधारावी म्हणून सरकार काम करीत असून, त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत, हीच आमच्या कामाची पोचपावती असल्याचे शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.