वानखेडेंविरोधातील चौकशी
निनावी तक्रारीच्या आधारे
एनसीबीची न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडेंनी तपास केलेल्या दोन प्रकरणांमधील कथित अनियमिततेबाबत सुरू केलेले चौकशीचे सत्र हे निनावी तक्रारींवर आधारित होते. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून नाही, अशी माहिती केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) मंगळवारी (ता. ७) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
वानखेडे यांची प्राथमिक चौकशी दोन विशिष्ट आणि निनावी तक्रारींच्या आधारे सुरू केल्याची माहिती, एनसीबीचे उपमहासंचालक (नैर्ऋत्य विभाग) विशाल सनाप यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. तसेच नवाब मलिक किंवा त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू नसल्याचेही स्पष्ट केले. त्यांच्या याचिकेची न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने दखल घेतली. त्या वेळी वानखेडेंचे वकील चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्रावर प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. त्याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी दोन आठवड्यांनंतर सूचीबद्ध केली.
प्रतिज्ञापत्रामध्ये काय?
वानखेडेंविरोधातील दोन्ही तक्रारींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोपांची पडताळणी आणि त्याबाबत चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणेकडे असल्याचेही एनसीबीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच वानखेडेंची चौकशी अद्याप प्राथमिक टप्प्यावरच आहे. वानखेडे यांना त्यांची बाजू मांडण्याची निष्पक्ष संधी मिळावी; कारण नैसर्गिक न्यायाचे तत्त्व हेच अपेक्षित असते, असेही त्यांना चौकशीसाठी बोलावल्याबाबत स्पष्टीकरण देताना नमूद केले. वानखेडे हे २०२४ पासून याचिका आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करून चौकशीच्या प्रक्रियेस विलंब करीत असल्याचा आरोप प्रतिज्ञापत्रात केला आहे.
प्रकरण काय?
अभिनेता सुशांतसिंह राजपूतशी संबंधित अमली पदार्थ प्रकरणाच्या तपासातील तसेच एका नायजेरियन नागरिकाला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी केलेल्या अटकेच्या तपासात अनियमितता असल्याच्या निनावी तक्रारीनंतर एनसीबीने वानखेडेंविरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानुसार, एनसीबीने नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात वानखेडे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी विशेष पथकासमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते; मात्र आपल्याला लक्ष्य केले जात असून सूडबुद्धीने चौकशी सुरू असल्याचा दावा करून वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.