वीस हजारांची लाच घेताना अधिकारी अटकेत
ठेकेदाराच्या प्रलंबित बिलांच्या मंजुरीसाठी मागणी
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली. विद्युत ठेकेदाराच्या प्रलंबित बिलांच्या मंजुरीसाठी या दोघांनी सात टक्के कमिशनची मागणी केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानुसार एसीबीने केलेल्या कारवाईत हे दोघे लाच स्वीकारताना सापडले.
तक्रारदार हे विद्युत ठेकेदार असून, त्यांना शिक्षण मंडळाच्या वाशी येथील कार्यालयातील विद्युत उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट मिळाले आहे. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील देखभाल- दुरुस्तीची एकूण तीन लाख १६ हजार ८०० रुपयांची बिले मंजुरीसाठी प्रलंबित होती. ही बिले मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी भांडार शाखाप्रमुख मनोहर पवार यांच्यामार्फत एकूण बिलाच्या सात टक्के याप्रमाणे २२ हजार १७६ रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजारांवर करण्यात आली.
लाचेची मागणी झाल्यानंतर ठेकेदाराने २५ मार्च २०२६ला नवी मुंबई एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी ६ एप्रिलला पडताळणी करण्यात आली. यामध्ये आहिरे यांनी लाच मागितल्याचे तसेच पवार यांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नवी मुंबई एसीबीच्या पथकाने सापळा लावून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र आहिरे यांनी त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राजेंद्र आहिरे आणि मनोहर पवार या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.