अंबरनाथ आरोग्य केंद्राचे
सात दरवाजे लंपास
अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) ः एकीकडे संपूर्ण जग ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करत असताना, अंबरनाथमध्ये मात्र आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेचे वाभाडे निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील शिवनगर येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील तब्बल सात दरवाजे चोरट्यांनी लंपास केले असून, ‘जागतिक आरोग्यदिनी’ हा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या सरकारी वास्तूची सुरक्षा रामभरोसे असल्याचे या चोरीमुळे स्पष्ट झाले आहे. यामुळे पालिका प्रशासनाच्या हलगर्जीबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शिवनगर परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने नगर परिषदेने हे केंद्र उभारले होते; मात्र गेल्या काही काळापासून हे केंद्र समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. पाणीटंचाई, साचलेला कचरा आणि देखभालीचा अभाव यामुळे आधीच नागरिक त्रस्त असताना, आता चक्क केंद्राचे दरवाजेच चोरीला गेल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य सेवा आणि जनजागृतीचा संदेश देणाऱ्या दिवशीच असा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आरोग्य केंद्राचे कर्मचारी शिरोसे यांनी माहिती दिली, की केवळ गॅल्व्हनाइझचे दरवाजे चोरीला गेले असून केंद्रातील बाकी साहित्य सुरक्षित आहे; मात्र सीसीटीव्ही कॅमेरे किंवा सुरक्षा रक्षक नसल्यामुळे चोरट्यांचे फावले असून, अंबरनाथ पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आरोग्यदिनीच आरोग्य केंद्राची अशी दुरवस्था समोर आल्याने जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.