स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीसाठी पोलिसांचे आवाहन
म्हसळा प्रकरणानंतर रायगड पोलिस प्रशासन सतर्क; कामगारांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक स्थलांतर करीत असले तरी त्यांच्या नोंदी स्थानिक प्रशासनाकडे नसल्याने अपघात किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये मदत मिळण्यास विलंब होतो. नुकत्याच म्हसळा येथील एका दांपत्यावर झालेल्या वेठबिगारीच्या प्रकारानंतर रायगड पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या या दांपत्याच्या चार मुलांना मालकाने डांबून ठेवले होते. तसेच दाम्पत्यालाही छळ सहन करावा लागत होता. अखेर हे दाम्पत्य पळून आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलांची सुटका केली.
या घटनेनंतर स्थलांतरित कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. कामासाठी बाहेर जाताना ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांच्याकडे नोंद करावी, तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मालकाचा संपर्क तपशील नातेवाइकांना द्यावा, असे सांगण्यात आले आहे.
प्रतिक्रिया :
जर कामाच्या ठिकाणी मालक किंवा मुकादम तुमचा पगार रोखत असेल, मारहाण करीत असेल किंवा तुम्हाला ओलीस धरत असेल, तर घाबरू नका, असे तुमच्यासोबत करणे म्हणजे कायदेशीर गुन्हा (वेठबिगारी) आहे. स्थानिक पोलिस ठाणे अथवा सामाजिक संस्था येथे तुमची एक तक्रार ही तुमचे व तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य वाचवू शकते. पोलिस प्रशासन तुमच्यासोबत आहे.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.