रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त
डोंबिवली एमआयडीसीत पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
डोंबिवली, ता. ८ : एमआयडीसी निवासी क्षेत्रातील काँक्रीट रस्त्यांची विविध विकासकामांच्या नावाखाली झालेली चाळण आता स्थानिक रहिवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कामे पूर्ण होऊनही महिनाभर रस्ते दुरुस्त न केल्यामुळे, पावसाळ्यात या परिसराला खड्ड्यांचे साम्राज्य ग्रासण्याची भीती व्यक्त होत असून, हे रस्ते तातडीने पूर्ववत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एमआयडीसी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून या भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले होते; मात्र त्यानंतर नाले, सांडपाणी वाहिन्या, गॅस पाइपलाइन आणि वीजवाहिन्यांच्या कामांसाठी हे रस्ते पुन्हा जागोजागी खोदण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, ही कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी रस्त्यांची डागडुजी करण्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नवीन काँक्रीट रस्त्यांची वाट लागली आहे. कामे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांनी रस्ते पूर्ववत करणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त न झाल्यास नागरिकांचा रोष ओढवेल. एमआयडीसीने तातडीने दखल घेऊन हे मार्ग सुस्थितीत करावेत, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख राजू नलावडे यांनी केली आहे.
नियोजनशून्य कारभाराचा फटका
पोटोबा हॉटेल वळणाजवळील ग्रीन्स स्कूल परिसरात नाला बांधकामासाठी खोदलेला मुख्य रस्ता तसाच पडून आहे. निवासी भागातील सुमारे सहा अंतर्गत रस्त्यांचीही हीच अवस्था आहे. खोदकाम करताना वारंवार वीज आणि गॅसवाहिन्या फुटल्याने नागरिकांना अंधारात किंवा गॅसविना राहण्याची वेळ येत आहे. उखडलेले रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेले मातीचे ढिगारे यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा तोंडावर आला असून, खोदलेले रस्ते वेळेत बुजवले नाहीत, तर या ठिकाणी चिखल आणि पाण्याचे साचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.