कोळसेवाडी रस्ता वादाच्या भोवऱ्यात
आराखडा बदलल्याचा आरोप; ठाकरे गटाचे उपोषण
कल्याण, ता. ९ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने विकसकाचे हित जोपासण्यासाठी कोळसेवाडी येथील प्रस्तावित रस्त्याचा मूळ आराखडा बदलल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धोरणाविरोधात कल्याण पूर्व शहराच्या वतीने मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून, यात बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक ते भैरव टी हाऊस असा हा रस्ता प्रस्तावित होता; मात्र, प्रशासनाने तांत्रिक बाबींना हरताळ फासत एका विकसकाला फायदा मिळवून देण्यासाठी रस्त्याची दिशा जॉली टेलर येथून चुकीच्या पद्धतीने वळवली असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
आराखड्यात फेरफार
मूळ आरक्षणाशी तडजोड करून रस्ता वळवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रस्ता कामासाठी जुन्या वृक्षांची नियमबाह्य कत्तल करण्यात आली असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपोषणात तक्रारकर्ते शांताराम गुळवे, रितू कांचन रसाळ यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि नारायण पाटील हे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सहभागी झाले आहेत.
विकसकाचे प्रतिआरोप
हे आंदोलन सुरू असतानाच ‘दीपाली इन्फ्रा प्रोजेक्ट’चे विकसक स्वामी यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी आपल्याकडे आर्थिक मागणी केल्याचा खळबळजनक आरोप स्वामी यांनी केला आहे, तर विकसकाने केलेले सर्व आरोप धादांत खोटे आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी केलेले आहेत. रस्ता बेकायदा वळवला जाणे आणि वृक्षतोड होणे हा जनतेच्या सोयीचा प्रश्न आहे. प्रशासनाने बिल्डरची पाठराखण न करता तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शरद पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.