मधमाशीपालनाला नवी दिशा
वाणगाव, ता. ९ (बातमीदार) : निसर्गाच्या सान्निध्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रयोग, प्रत्यक्ष प्रशिक्षण, बदलणारी मानसिकता आणि निसर्गाशी सुसंवाद साधत शेतीत उत्पादन वाढविण्याचा सर्वात प्रभावी आणि पर्यावरणपूरक मार्ग डहाणूतील यशस्वी मधुमक्षिकापालक विनय पाटील आणि त्यांच्या पत्नी निकीता पाटील यांनी स्वीकारला आहे. हे जोडपे मधुमक्षिकापालन व्यवसायात सक्षम आणि यशस्वी मधुपालक म्हणून प्रसिद्धीस येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘विपानि बी हाऊस’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मधशाळा’ या शास्त्रीय प्रशिक्षण उपक्रमातून केवळ ज्ञानच नाही, तर नवकल्पना आणि प्रत्यक्ष उपयोगी तंत्रज्ञान विकसित होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकाला व्यवसाय म्हणून मधमाशीपालन करायचे नसते; पण परागीभवनासाठी एक-दोन पेट्या ठेवायच्या असतील तर त्या महाग पडतात; यावर काही स्वस्त पर्याय आहे का, या प्रश्नातूनच कमी खर्चात मधमाशीपालनाची संकल्पना विकसित झाल्याचे विनय पाटील यांनी सांगितले.
मडक्यात काठीच्या साहाय्याने पोळे अडकवून त्यामध्ये वसाहत बसवण्याचा प्रयोग करण्यात आला. या पद्धतीमुळे मडके किंवा मधमाशी वसाहत स्थलांतरित करणे सहज शक्य झाले. अभ्यास करून पुढे मातीच्या भांड्यातच लाकडी फ्रेम्स बसवण्याची संकल्पना विकसित करण्यात आली. या सुधारित रचनेमुळे पोळ्यांची सहज तपासणी करता येते. देखरेख व स्वच्छता शक्य होते. वसाहत कोणत्याही ठिकाणी सहज स्थलांतरित करता येते. ही पद्धत यशस्वी ठरली असून, अगदी सुमारे २०० रुपयांच्या खर्चात शेतकरी स्वतः घरी असे मधमाशी घर तयार करू शकतात, ही या प्रयोगाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
मडक्यापासून मधमाशी घर तयार करणे, तसेच डंखरहित मधमाशांसाठी विशेष बॉक्स विकसित करताना केवळ उपयोगितेचाच विचार करण्यात आलेला नाही, तर त्याला आकर्षकतेचीही जोड देण्यात आली आहे. विनय पाटील आणि निकिता पाटील या दाम्पत्याने या प्रयोगांना कलेची जोड दिली आहे, जेणेकरून हे मधमाशी घर केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा टेरेसवर ठेवले असता ते अधिक सुंदर आणि शोभून दिसेल. त्यामुळे मधमाशीपालन हा केवळ शेतीपूरक उपक्रम न राहता, घराच्या सजावटीसोबत निसर्गाशी नाते जोडणारा एक सुंदर उपक्रम ठरत आहे.
--------------------
शेतकऱ्यांसाठी आवाहन
आजही अनेक शेतकऱ्यांनी या नवकल्पनेचा प्रत्यक्ष अवलंब केलेला नाही; परंतु जर ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली, तर पिकांचे परागीभवन मोठ्या प्रमाणात वाढेल. उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. नैसर्गिक शेतीला बळ मिळेल, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी या सोप्या आणि कमी खर्चिक पद्धतीचा अवलंब करून प्रत्यक्ष फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
प्रयोगाची खास वैशिष्ट्ये
मध पूर्णपणे हात न लावता मिळतो.
फक्त बाटली काढून, मधमाशा हलक्या झटकून, झाकण लावले की उत्पादन तयार करता येते.
पोळ्याला कोणताही स्पर्श नाही, त्यामुळे शुद्धता टिकून राहते
अशा प्रकारे तयार झालेला मध बाजारात अधिक दरात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो.
शेतकरी ही पद्धत अवलंब करून आपल्या उत्पादनाला अधिक मूल्य देऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.