नव्या आयुक्तांपुढे सर्वांगीण विकासाचे आव्हान
अनधिकृत बांधकामांना कसा आळा घालणार, याकडे साऱ्यांचे लक्ष
विरार, ता. ९ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेची स्थापना होऊन जवळपास पंधरा वर्षे होत आली, परंतु आजही त्या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न कायम आहे. नव्याने आलेले आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना हा प्रश्न सर्वात जास्त भेडसावणारा असेल. कारण या बांधकामांवर कारवाई करण्यासह पुन्हा अनधिकृत बांधकामे होणार नाही, ना यावर त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांना सांभाळून घेत त्यांना वसई-विरारच्या विकास करावा लागणार आहे.
पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या महापालिकेत जवळपास पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. वसई-विरार हे मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर असले तरी या विकासाला नियोजनाची योग्य जोड नसल्याने निर्माण झालेल्या समस्या आता नव्या आयुक्तांच्या दाराशी उभ्या आहेत. यात सर्वात मोठे आणि संवेदनशील आव्हान म्हणजे शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न होय. उपलब्ध आकडेवारीनुसार या क्षेत्रातील तब्बल ५० टक्के इमारती अवैध असल्याचे समोर आले आहे. यामुळे केवळ नागरी सुविधांवर ताण येत नसून, शहराच्या पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. आरक्षित भूखंडांवर झालेली अतिक्रमणे आणि त्यातून उद्भवलेले भूमाफियांचे जाळे मोडीत काढतानाच सामान्यांचे नुकसान टाळण्याचे मोठे कसब नव्या आयुक्तांना दाखवावे लागणार आहे.
या प्रशासकीय आव्हानांसोबतच शहराचा रखडलेला विकास आराखडा (डीपी) मार्गी लावणे, हे पृथ्वीराज बी. पी. यांच्या अजेंड्यावरील सर्वोच्च प्राधान्य असेल. २००१ ते २०२१ या कालावधीचा आराखडा संपून पाच वर्षे उलटली तरी नवीन आराखड्याची अंमलबजावणी न झाल्याने शहराचा विकास विस्कळित झाला आहे. अशातच बुलेट ट्रेन आणि विरार-वडोदरा एक्स्प्रेस वे यासारखे राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प शहरातून जात असताना या प्रकल्पांचा स्थानिक गरजांशी ताळमेळ बसवणे हे एक गुंतागुंतीचे काम आहे. आयुक्तांचे आयआयटी आणि आयआयएममधील शिक्षण तसेच माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा अनुभव पाहता महापालिकेच्या कामकाजात ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विशेषतः मालमत्ता करवसुली आणि बांधकाम मंजुरी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केल्यास भ्रष्टाचार आणि अनियमिततेला आळा बसू शकेल. पुण्यात त्यांनी राबवलेले यशस्वी प्रयोग आता वसई-विरारमध्ये कशा प्रकारे लागू होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
=================================
शहरातील सामान्य नागरिक ही प्राथमिकता असून, त्यांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन वसई विरार महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले. पृथ्वीराज बी. पी. यांनी वसई विरार महापालिकेचे ९वे आयुक्त म्हणून पदभार स्वीकाराला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवसापासून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत कामाची माहिती आणि आढावा घेतला. नागरिकांना प्रथम प्राधान्य देऊन शहरातील प्राथमिक सोयी-सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचे सांगितले आहे.
------------------
प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, पर्यावरण संवर्धन, शहरातील वाढत्या हवा गुणवत्ता निर्देशांकावर नियंत्रण कसे मिळवता येईल, याकडेही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा भाग म्हणून वसई-विरार शहराला ग्रोथ हब म्हणून अजून कसे विकसित करता येईल, यादृष्टीने काम केले जाणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी. आयुक्त, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.