वर्तकनगरमधील खेळाच्या मैदानावर अतिक्रमण
सातबारा उताऱ्यावरून पालिकेचे नाव हटवल्याने खळबळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : वर्तकनगर परिसरातील २.१५ हेक्टर आरक्षित खेळाच्या मैदानावर झालेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या जागेच्या सातबारा उताऱ्यावरून चक्क ठाणे महापालिकेचे नाव हटवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
समाजसेवक जितेंद्रकुमार इंदिसे यांनी या भूखंडावरील बेकायदा हालचालींविरोधात आवाज उठवत सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या विधी विभागाने आता महसूल विभागातील दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. वर्तकनगर येथील श्री जानकादेवी मंदिर आणि लिटिल फ्लॉवर स्कूललगतचा सुमारे २.१५ हेक्टरचा भूखंड (क्र. १८२) २००३ मध्ये मैदानासाठी आरक्षित करण्यात आला होता. या जागेचा टीडीआर मे. हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला आहे.
सातबारा उताऱ्यातील फेरफार
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही महापालिकेला सुनावणीसाठी न बोलावता उताऱ्यावरून पालिकेचे नाव हटवण्यात आले. याप्रकरणी ठाणे उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. मैदानावर विनापरवाना माती उत्खनन करून तिचा साठा करण्यात आला आहे. तसेच, धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोपही इंदिसे यांनी केला आहे.
प्रशासकीय निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
तक्रारदार इंदिसे यांनी ७ एप्रिल रोजी तहसीलदार उमेश पाटील यांना छायाचित्रांसह या अतिक्रमणाची माहिती दिली होती; मात्र कारवाईचे आश्वासन मिळूनही बराच वेळ कोणतीही शासकीय यंत्रणा घटनास्थळी न पोहोचल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कारवाईची मागणी
मैदानाच्या जागेवर झालेली ही फेरफार आणि अतिक्रमण अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम्ही महापौरांकडे केली आहे. नागरिकांच्या हक्काचे मैदान वाचवण्यासाठी हा लढा सुरूच राहील, अशी माहिती समाजसेवक जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.