पाणीचोरीप्रकरणी प्लंबरवर गुन्हा
भिवंडी महापालिकेची धडक कारवाई
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून अनधिकृत नळजोडण्या देणाऱ्या एका प्लंबरविरोधात भिवंडी महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. या पाणीचोरीप्रकरणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, यामुळे अनधिकृत नळजोडण्या देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मोहम्मद इस्लाम इशा शाह उर्फ गुड्डू असे गुन्हा दाखल झालेल्या प्लंबरचे नाव आहे. त्याने पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आरोपीने निजामपुरा हद्दीतील आमपाडा येथील ''१२ चाळी'' परिसरात महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडले आणि चार अनधिकृत जोडण्या घेतल्या. या पाणीचोरीमुळे महापालिकेचे २० हजार रुपयांच्या पाण्यासह एकूण ३४ हजार ८०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सरफराज अंसारी, विराज भोईर, पथक प्रमुख नफीस मोमीन आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
अनधिकृत नळजोडण्यांविरुद्ध मोहीम तीव्र
शहरातील विविध भागांत पाणीचोरी आणि अनधिकृत नळजोडण्यांमुळे पालिकेचा महसूल बुडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. जलवाहिन्यांचे नुकसान करणाऱ्या आणि पाणी चोरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.