नेरूळ सेक्टर १० भूखंडावर टर्फ मैदानाची मागणी
‘अर्धे उद्यान, अर्धे मैदान’ संकल्पना सभागृहात चर्चेत
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : महापालिका महासभेत नेरूळ सेक्टर १० मधील भूखंडाच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, नगरसेवक प्रदीप गवस यांनी ‘फक्त बाग नव्हे, तर खेळाडूंना टर्फ मैदानही द्या’ अशी ठाम मागणी केली. संबंधित भूखंडाचा सध्याचा वापर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या जागेचा सर्वसमावेशक विकास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी उभारलेल्या विरंगुळा केंद्राच्या नामफलकाची अक्षरे गळून पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. यावरून कामांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
गवस यांनी ‘अर्धे उद्यान आणि अर्धे मैदान’ ही संकल्पना मांडत, मैदानाच्या भागात अत्याधुनिक टर्फ उभारण्याची मागणी केली. यामुळे युवकांना फुटबॉल, क्रिकेटसारख्या खेळांसाठी दर्जेदार सुविधा मिळतील, तर उर्वरित भागात सुशोभित उद्यान, चालण्यासाठी ट्रॅक, बसण्याची व्यवस्था आणि हिरवळ निर्माण करून नागरिकांना विरंगुळ्याची जागा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या कामांवर टीका करत त्यांनी दुरवस्थेची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रस्तावामुळे सभागृहात चर्चा रंगली असून, प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट
सर्वसमावेशक विकासाची मागणी
स्थानिक नागरिक व खेळाडूंसाठी क्रीडा व विरंगुळा सुविधा एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यासाठी या भूखंडाचा संतुलित विकास करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.