टीबीएम अखेर मुंबईत दाखल
बुलेट ट्रेन प्रकल्पातील १६ किमी बोगद्याच्या खोदकामाला वेग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : चीनमध्ये अडकलेल्या टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)मुळे काही काळ अडथळ्यात सापडलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या बीकेसी-शिळफाटा भूमिगत बोगद्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या टीबीएम मशीनपैकी दोन मशीन मुंबईत दाखल झाल्या आहेत. विक्रोळी येथे त्यांच्या जुळणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईतील २१ किलोमीटर लांबीचा हा बोगदा प्रकल्पाचा कणा मानला जातो. यामध्ये ठाणे खाडीखालून जाणारा देशातील पहिलाच सुमारे सात किलोमीटरचा सागरी (अंडरसी) बोगदाही समाविष्ट आहे. या २१ किमी बोगद्यापैकी सुमारे पाच किलोमीटरचे काम ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड’ पद्धतीने पूर्ण झाले आहे. उर्वरित १६ किलोमीटरचे खोदकाम टीबीएमच्या साहाय्याने करण्यात येणार आहे. टीबीएम मशीनच्या पुरवठ्यात झालेल्या विलंबामुळे या महत्त्वाच्या टप्प्याचे काम मंदावले होते; मात्र आता मशीन प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी पोहोचल्याने बोगद्याच्या खोदकामाला पुन्हा वेग येणार आहे. विक्रोळी-बीकेसी दुहेरी ड्राइव्ह प्रकल्पासाठी बीकेसी, विक्रोळी आणि सावली (घणसोलीजवळ) येथे तीन शाफ्ट उभारण्यात आले आहेत. यापैकी एक टीबीएम विक्रोळी येथून बीकेसीकडे खोदकाम करणार आहे. तर दुसरे मशीन सावली येथून विक्रोळीकडे पुढे सरकणार आहे. या दुहेरी ड्राइव्हमुळे बोगद्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रकल्प प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. विक्रोळी येथे सुमारे १७० मेट्रिक टन वजनाचा टीबीएमचा मुख्य भाग ५६ मीटर खोल शाफ्टमध्ये उतरवण्यात आला आहे. ही खोली साधारण २० मजली इमारतीएवढी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
अशी आहे टीबीएम मशीन
ही टीबीएम मशीन कठीण भूगर्भीय परिस्थितीत सुरक्षित खोदकाम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मशीन सुमारे ९५ मीटर लांबीची आहे. त्यामध्ये कटर व्हील, मुख्य बेअरिंग, जॉ क्रशर, एरेक्टर, मुख्य व टेल शील्ड तसेच चार विशेष गँट्रींचा समावेश आहे. ही मशीन प्रति मिनिट ४ आरपीएम वेगाने फिरू शकते आणि सुमारे ४९ मिमी प्रति मिनिट खोदकाम करू शकते. सर्वसमावेशक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जुलै २०२६ मध्ये प्राथमिक चाचणी आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये मुख्य काम सुरू होण्याची शक्यता आहे.
-----
बोगदा प्रकल्प एक नजर
एकूण लांबी : २१ किमी
पूर्ण झालेले काम : ५ किमी
उर्वरित काम : १६ किमी
सागरी बोगदा : ७ किमी
बोगद्याचा व्यास : सुमारे १३ मीटर
कमाल खोली : ११४ मीटर
---
टीबीएमची वैशिष्ट्ये
एकूण प्राप्त मशीन : २
वजन : ३०८० टन व ३१८४ टन
लांबी : ९५.३२ मीटर
तंत्रज्ञान : मिक्स शील्ड/स्लरी आधारित
कमाल वेग : ४ आरपीएम
खोदकाम क्षमता : ४९ मिमी प्रति मिनिट
-----
पुढील टप्पे
टीबीएम जुळणी : सुरू
प्राथमिक ड्राइव्ह : जुलै २०२६
मुख्य ड्राइव्ह : ऑक्टोबर २०२६
बोगदा खोदकामाला अपेक्षित गती
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.