‘एसआरए’ मोहिमेला १० दिवसांची मुदतवाढ
मुंब्रा-कौसा भागात आता २० एप्रिलपर्यंत नोंदणी शक्य
ठाणे, ता. १० : मुंब्रा-कौसा परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मॅपिंग प्रक्रियेला नागरिकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, या मोहिमेला आता २० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या विनंतीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी शमीम अहमद खान, अशरफ (शानू) पठाण आणि माजी नगरसेवकांच्या माध्यमातून मुंब्रा ते कौसा यादरम्यान ठिकठिकाणी मार्गदर्शन शिबिरे राबवण्यात येत आहेत. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, ‘बीएलओ’ची संख्या कमी असल्याने आतापर्यंत सुमारे दोन लाख नागरिक मॅपिंग प्रक्रियेपासून वंचित राहिल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंब्रा-कळवा अध्यक्ष शमीम अहमद खान यांनी ८ एप्रिल रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन मुदतवाढीची मागणी केली होती.
मुंब्रा-कौसा येथील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ मिळावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. मुदतवाढीमुळे आता जास्तीत जास्त लोक नोंदणी करू शकतील. नागरिकांनी या वाढीव वेळेचा लाभ घेऊन आपले मॅपिंग पूर्ण करून घ्यावे, अशी प्रतिक्रिया शमीम अहमद खान यांनी दिली.
प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
नागरिकांच्या सुविधेसाठी आणि कोणताही पात्र रहिवासी या प्रक्रियेतून सुटू नये यासाठी, निवडणूक निर्णय अधिकारी संदीप थोरात यांनी ही मुदत १० दिवसांनी वाढवून दिली आहे. या निर्णयाबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच ज्या नागरिकांची नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी २० एप्रिलपूर्वी आपल्या जवळच्या शिबिरात जाऊन ‘एसआरए मॅपिंग’ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.